नागपूर : मुलाने जन्मदात्या बापाचा केला निर्घूण खून; मृतदेह रस्त्यावर फेकून केले भरपेट जेवण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – क्षुल्लक कारणावरून मुलाने जन्मदात्या वडिलाचा धारधार शस्त्राने वार करून निर्घूण (son-kills-his-father) खून केला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बापाचा मृतदेह घराबाहेर रस्त्यावर फेकून दिला. नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरात ही धक्कादायक आणि क्रूर घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

सम्राट रंगारी (वय 55) असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे. सिकंदर रंगारी (वय 19) असे खून केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सिकंदर हा एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला आहे, तर मृत वडील सम्राट रंगारी काय काम करत होते, याची माहिती मिळू शकली नाही. घटनेच्या वेळी वडील सम्राट आणि आरोपी सिकंदर हे दोघेही घरीच होते. दरम्यान, त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून दोघात बाचाबाची सुरू झाली, मात्र काही वेळातच वादाने हिंसक रूप धारण केले. कुणालाही काही कळण्यापूर्वीच सिकंदरने त्याच्या जवळ असलेल्या शस्त्राने सपासप वार करून वडील सम्राट यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवले.

त्यानंतर आरोपीने आपल्या वडिलांचा मृतदेह घराच्या बाहेरील रस्त्यावर फेकून दिला. त्यानंतर आरोपीने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. एवढेच नाही तर आरोपीने घरात गेल्यानंतर अंगावरील कपडे काढून जेवण केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक करून तपास सुरू केला आहे.

You might also like