सोनाक्षी सिन्हा फसवणूक प्रकरण : PM, CM आणि DGP यांना रोज केलं ट्विट ! जाणून घ्या 455 दिवसांची पूर्ण कहाणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा विरोधात चार्जशीट दाखल करण्यासंदर्भात पीडित प्रमोद शर्मानं पोलीस स्टेशनला खूप चकरा मारल्या. यानंतरही पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं नव्हतं. यानंतर प्रमोदनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, डीजीपी हितेंद्र अवस्थी व एडीजी अविनाश चंद्रा यांच्याशी रोज फेसबुक आणि ट्विटरवरून संपर्क साधला

यानंतर पोलीस सक्रिय झाले. सीओ कटघर पूनम सिरोही यांनी सांगितलं की, सोनाक्षी सिन्हासहित पाच आरोपींविरोधात जवळपास 100 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. तपासात सर्व आरोपी नामांकित आरोपींची भूमिका समोर आली आहे.

पोलिसांनी तपासात पाचही लोकांना आरोपी मानत चार्जशीट दाखल करण्यासाठी 455 दिवस लावले आहेत. कटघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवपुरी कॉलनीतील रहिवासी प्रमोद कुमार शर्मा इव्हेंट मॅनेजर आहे.

प्रमोद कुमार यांनी 22 फेब्रुवारी 2019 रोजी कटघर पोलीस ठाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या कंपनीचे पदाधिकारी अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, घूमिल ठक्कर, एडगर सकारिया यांच्या विरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला होता.

यात प्रमोदनं सांगितलं की, दिल्लीत त्यानं एक कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी त्यांनी टॅलेंट फुल ऑन आणि एक्सीड एंटरटेनमेंट कंपनीमार्फत सोनाक्षी सिन्हा बोलावण्यासाठी विनंती केली होती. यासाठी हप्त्या हप्त्यानं 29 लाख 92 हजार रुपये सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या कंपनीच्या खात्यात जमा करण्यात आले होते. ठरलेल्या तारखेच्या सकाळी प्लेनचं तिकीटही बुक करण्यात आलं होतं. यानंतरही ती कार्यक्रमासाठी आली नव्हती.