माझे राजकीय नेत्याशी लग्न झालेले नाही : सोनाली कुलकर्णी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लॉकडाउन कालावधीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात आहे. तिच्या लग्नाच्या अफवानंतर ‘माझे कोणत्याही राजकीय नेत्याशी लग्न झाले नाही’, हे स्पष्ट करत असतानाच सोनालीने लग्नाबाबत तिची कोणती स्वप्ने आहेत याची माहिती दिली आहे.

सोनालीचे लग्न झाले, अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्याविषयी सोनाली म्हणाली, मी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असताना सोशल मीडियावर माझ्या लग्नाची बातमी व्हायरल झाली. कोल्हापूरच्या एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाशी लग्न झाल्याची बातमी होती. आम्ही सगळेजण ती बातमी वाचून हसलो, कारण त्यात तथ्य काहीच नव्हते. अफवा समजून मी त्याकडे दुर्लक्षसुद्धा केले. मात्र काही दिवसांनी मला माझ्या सख्ख्या चुलत बहिणीचा फोन आला. ती माझ्या लग्नाबद्दल विचारत होती. तेव्हा मला समजले की ही अशीच पसरणारी साधी अफवा नाही.

माझा मित्र सुशांत शेलारला मी याबद्दल माहिती काढण्यास सांगितले. कारण सुशांतचे बरेच राजकीय संपर्क आहेत. त्याने थोडीफार माहिती काढली तेव्हा समजले की कोल्हापूरच्या एका विरोधी पक्षाने त्या संबंधित राजकीय नेत्याची प्रतिमा मलिन व्हावी यासाठी अशा लग्नाच्या बातम्या पसरवल्या होत्या. मात्र यात माझे नाव का गोवण्यात आले हे मला आजपर्यंत पडलेले कोडे आहे. या सर्व अफवांचा खूप त्रास झाला पण कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे मी यातून सावरू शकले, असे सोनाली म्हणाली.