कर्करोगावरील उपचारानंतर सोनाली बेंद्रे मायदेशी परतली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या काही महिन्यांपासून न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होती. या उपचारानंतर सोनाली बेंद्रे भारतात परतली आहे. केमोथेरपी उपचारानंतर सोनालीच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. सोनाली बेंद्रेचा पती गोल्डी बहलने सांगितले, सोनालीच्या आरोग्यात चांगली सुधारणा होत आहे. सध्या तिच्यावरील उपचार थांबवण्यात आले आहेत. पण आजार पुन्हा डोके वर काढू शकतो, हे टाळण्यासाठी नियमीत तपासणी करणे गरजेचे आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिला झालेल्या कर्करोगावर उपचार घेण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये होती. परंतु आता ती मायदेशी परतली आहे. नुकतीच सोनालीने याबाबत एक इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. आपल्या देशात येणे हे तिच्यासाठी किती खास आहे हे तिने सांगितले होते. काही काळ विश्रांती घेऊन ती पुन्हा पुढील उपचारांसाठी न्यूयॉर्कला जाणार असल्याचेही तिने यामध्ये म्हटले होते. सोनालीला हायग्रेड कॅन्सर झाला असून तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यानंतरही सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असल्याने ती ठराविक काळाने काही पोस्ट करत असते.

आपल्यावरील उपचारांचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता आपल्याला मायदेशात जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे असे सोनालीने या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले होते. आपल्या घरापासून दूर न्यूयॉर्कमध्ये राहताना तिची मानसिक स्थिती कशी झाली याबद्दल तिने लिहीले होते.

या आजाराशी झुंज देत असताना सोनालीने स्वत:ला अतिशय सकारात्मक ठेवल्याचे आपल्याला तिच्या सगळ्याच पोस्टमधून वारंवार दिसून आले आहे. या पोस्टमध्ये सोनाली म्हणते, लढा संपलेला नाही, पण मी आनंदी आहे आणि आता मिळत असलेल्या ब्रेकही अतिशय छान असेल. या पोस्टसोबत सोनालीने आपला एक फोटोही शेअर केला होता. या पोस्टनंतर सोनाली भारतात परतली आहे.