‘कर्करोगापेक्षा ‘हे’ फार जास्त वेदनादायी’ : सोनाली बेंद्रे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कॅन्सरपेक्षा त्याच्यावरील उपचार जास्त वेदानादायी असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या असे अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने म्हटले आहे. कॅन्सर आणि त्यावरील उपचार या विषयावरील एका कार्यक्रमात सोनाली बेंद्रे बोलत होती. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हाय ग्रेड कॅन्सरवर उपचार घेऊन काही महिन्यांपूर्वीच मायदेशी (भारतात) परतली आहे. सोनाली सध्या विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. अशाच एका कार्यक्रमात ती बोलत असताना तिने कॅन्सर आणि त्यावरील उपचारावर भाष्य केलं.

एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झाल्यानंतर सोनाली बेंद्रेने कर्करोगाबाबत तिने दिलेल्या लढ्याबाबत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सोनाली म्हणाली की, “कर्करोगासारखा आजार वेळीच लक्षात आला तर त्यावर उपचार घेणं परवडणारं ठरतं. हा आजार लवकर समजलातर उपचार घेताना होणाऱ्या वेदनाही कमी होतात. मात्र जर लवकर लक्षात आला नाही तर प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे तुम्ही स्वत:ची नीट काळजी घ्या. हा आजार मला कधीच होणार नाही या भ्रमात राहू नका. तो कधीही आणि कोणत्याही वयात अचानकपणे होऊ शकतो. कॅन्सर हा रोगच मुळात भयावह आहे.” असे सोनाली म्हणाली.

सोनालीला हाय ग्रेड कॅन्सरचे निदान जुलै 2018 मध्ये झाले होते. तिच्या या आजाराबाबत तिने स्वत:सोशल मीडियावर माहिती दिली होती. न्यूयॉर्क मध्ये सोनालीने कॅन्सरवर उपचार घेतले आहे. काही महिन्यांपूर्वीच ती भारतात परतली आहे.