सोनसाखळी चोरांकडून साडेपाच लाखांचा ऐवज केला जप्त

नाशिक :पोलिसनामा ऑनलाईन

रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र व मोबाइल दुचाकीवरून येऊन हिसकावून नेणाऱ्या संशयितासह एका अल्पवयीन मुलाला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. तर आणखी एका अल्पवयीनाचा शोध सुरु असून, पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.

कल्पेश मनोज गुंजाळ (२२, रा. कैलासनगर, आडगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. यासह आरोपीला मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास अटक केली असून,आणखी एका अल्पवयीनांचा शोध सुरू आहे. आरोपीकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,गुन्हेशोध पथकातील पोलिसांना कल्पेश गुुंजाळबाबत माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने दोन सोनसाखळी व २७ मोबाइल तसेच दोन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक लाख ८० हजार रुपयांच्या दोन पल्सर दुचाकी, दीड लाख रुपयांचे ५५ ग्रॅम सोने, दोन लाख ३५ हजार रुपयांचे २७ मोबाइल असा एकूण पाच लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील, गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर वाघ, मच्छिंद्र कोल्हे, पोलीस हवालदार गायकर, उगले, पोलीस कर्मचारी नितीन नेटारे, देसले, ढगे, सुपले यांनी पार पाडली