सोनभद्रमधील सोन्यावरून शशि थरूर यांनी उडवली ‘खिल्ली’, म्हणाले – ‘टन-टना-टन गोष्टी सरकारनं बंद कराव्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये हजारो टन सोने सापडल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सरकारची खिल्ली उडवली आहे. थरूर यांनी म्हटले की, या सरकारने टन – टना – टन गोष्टी कमी केल्या पाहिजेत. मोदी सरकारवर निशाणा साधताना थरूर म्हणाले, टन-मन-धन बाबत हे सरकार बेभान झाले आहे.

सोन्याच्या वृत्ताने युपी सरकार झाले खुश
उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये हजारो टन सोने मिळाल्याचे वृत्त पसरल्यानंतर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी हा भगवान रामाचा आशीर्वाद असल्याचे म्हटले. सोनभद्र जिल्ह्याचे खनिज अधिकारी के. के. राय यांनी शुक्रवारी दावा केला होता की, सोनभद्रचा सोन डोंगर आणि हरदी डोंगरात अनुक्रमे 2,943.26 टन आणि 646.16 टन सोन्याचा साठा सापडला आहे.

जीएसआयने फेटाळला दावा
सोने सापडल्याच्या बातमीला मीडियात जबदस्त कव्हरेज मिळाले. परंतु, शनिवारी रात्री उशीरा भारतीय भूगर्भ विज्ञानातील सर्वात मोठी संस्था असलेल्या जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने हा दावा फेटाळला. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संचालक डॉ. जी. एस. तिवारी यांनी शनिवारी म्हटले की, जीएसआयने सोनभद्रमध्ये अशाप्रकारच्या साठ्याचा कोणताही अंदाज व्यक्त केलेला नाही. ते म्हणाले की, 52,806.25 टन स्वर्ण खनिज सापडले आहे, हे शुद्ध सोने नाही. स्वर्ण खनिजामधून केवळ 3.03 ग्रॅम प्रति टन शुद्ध सोने निघणार आहे. या संपूर्ण खनिजातून 160 किलोग्रॅम सोने निघू शकते.

शशि थरूर जोरदार निशाणा
जीएसआयने तीन हजार टन सोने मिळाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले की, आपले सरकार टन-मन-धन बाबत खुपच बेभान का आहे ? अगोदर गृहमंत्र्यांनी फाइव्ह मिलियन टन इकॉनॉमीचे वक्तव्य केले होते. यानंतर युपीतून 3350 टन गोल्ड रिझर्व्हचे वृत्त आले, जे नंतर केवळ 160 किलो असल्याचे समजले. या सरकारने टन – टना – टन गोष्टी थोड्या कमी केल्या पाहिजेत.

सोन्याचा साठा मिळण्याचे वृत्त नाकारताना जीएसआयने म्हटले की, राज्य यूनिटसोबत सर्वे केल्यानंतर एखादा धातू मिळाल्याची माहिती दिली जाते. जीएसआय (उत्तर क्षेत्र) ने या क्षेत्रात (सोनभद्र) 1998-99 आणि 1999-2000 मध्ये खोदकाम केले होते, तो रिपोर्ट उत्तर प्रदेशचे डीजीएम यांना देण्यात आला होता, जेणेकरून त्यावर पुढील कार्यवाही केली जावी.