मोदी सरकारला घेरण्यासाठी सोनिया गांधींनी बोलावली बैठक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात जीसटी आणि कोरोना संकटामुळे राज्यांना झालेले आर्थिक नुकसान याशिवाय जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी वारंवार होत असलेल्या मागणीवर मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हात मिळवला आहे. भाजपा सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली असून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे.

जीएसटी काऊन्सिलची बैठक पार पडणार असून त्यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. सर्व राज्यांचे अर्थमंत्री या जीएसटी काऊन्सिलचा भाग आहेत. या बैठकीत विरोधी पक्षातील मुख्यमंत्री 14 टक्के जीएसटी भरपाईची मागणी करण्याची शक्यता आहे. विद्यार्थी तसेच इतर विषयांवर केंद्र सरकारविरोधात भक्कमपणे उभे राहत एकत्र लढणे हा बैठकीचा मुख्य मुद्दा आहे. ममता बॅनर्जी यांनी आतापर्यंत दोन वेळा केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी यासाठी पत्र लिहिले आहे.

मात्र केंद्र सरकार परीक्षा घेण्यावर ठाम आहे. सुरक्षेचे सर्व उपाय करत जेईई आणि नीट परीक्षा होणार असल्याचे केंद्राच म्हणणे आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीवरही चर्चा होईल. या बैठकीत काँग्रेसची सत्ता असणार्‍या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.