सोनिया गांधीच असणार काॅंग्रेसच्या ‘नेत्या’ ; संसदीय दलाच्या बैठकीत मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह, नवनियुक्त खासदार आणि राज्यसभा सदस्ययांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या संसदीय मंडळाची नवी दिल्लीमध्ये आज बैठक होत आहे. लोकसभेत काँग्रेसचा नेता निवडण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची चांगलीच पीछेहाट झाली आहे. काँग्रेसला केवळ ५२ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. संख्याबळ कमी असल्याने कॉग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मिळणार नाही. अशातच राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्ती केली होती. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत.