‘या’ कारणामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सोनिया गांधी नाराज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यावर स्वतः काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्याच्या कव्हर पेजवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो लहान आकारात छापल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपाने टीकास्त्र सोडले होते. आणि आता स्वतः काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जाहीरनाम्याचे कव्हर पेज लोकांना आकर्षित करण्यासारखे असायला हवे. मात्र तसे झाले नाही. त्याचसोबत राहुल गांधी यांचा फोटो मोठ्या आकारात छापणे गरजेचे होते पण छोट्या आकाराचा फोटो छापण्यात आला. असे म्हणत सोनिया गांधी यांनी जाहीरनामा कमिटीचे सदस्य राजीव गौडा यांना फटकारले. इतकेच नव्हे तर, जाहीरनाम्यात दिलेले आश्वासने चांगली असली तरी कव्हर पेज लोकांना आकर्षित करणारे नाही. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, काँग्रेसच्या जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रम ज्यावेळेला सुरु होता त्याचवेळी व्यासपीठावर जाण्याअगोदर सोनिया यांनी राजीव गौडा यांना सुनावले. यावेळी गौडा यांनी सोनियांना समजवण्याचा प्रयत्न केला तरीही सोनिया गांधी संतुष्ट झाल्या नाहीत. पूर्ण कार्यक्रमादरम्यान सोनिया गांधी यांनी मौन बाळगलं. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थितांना सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता असं सांगितल्यावर सोनिया यांनी प्रश्न घेणे टाळले.