काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींकडे ‘ऐवढी’ आहे संपत्ती

राहुल गांधी यांच्याकडून घेतले 'ऐवढे' कर्ज

लखनौ : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सोनिया गांधी यांच्याकडे केवळ ६० हजार रुपयांची रोकड आहे तर १६ लाख ५९ हजार रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले आहेत.

सोनिया गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे रिलायन्स हायब्रिड बॉन्डसह २ कोटी ४४ लाख ९६ हजार ४०५ रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच २८ हजार ५३३ रुपये किंमतीचे करमुक्त बॉन्ड आहेत. सोनिया गांधी यांनी पोस्टल सेव्हींग्ज, विमा, राष्ट्रीय बचत योजनेत ७२ लाख २५ हजार ४१४ रूपये गुंतवणूक केली आहे.

त्यांच्याकडे नवी दिल्ली येथील डेरामंडी गावात शेतजमीन आहे. या जमिनीची किंमत ७ कोटी २९ लाख ६१ हजार ७९३ रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे इटलीमध्ये ७ कोटी ५२ लाख ८१ हजार ९०३ रुपयांची वारसा हक्काने मिळालेली संपत्ती आहे. सोनिया गांधी यांनी मुलगा राहुल गांधी यांच्याकडून पाच लाखांचे कर्ज घेतले आहे. तर ५९ लाख ९७ हजार २११ रुपयांचे दागिने असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.