अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सोनिया गांधी ‘एक्शन’ मोडमध्ये, राहुल यांच्याशी ‘गद्दारी’ करणाऱ्यांचा शोध सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड केल्यानंतर त्या तात्काळ सक्रिय झाल्या असून त्यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, झारखंडमधील नेत्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर लवकरच झारखंडमधील विधानसभा निवडणुकांसाठी त्या नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी देणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षात सुरु असलेल्या गटबाजीवर त्या गांभीर्याने विचार करत असून, कडक भूमिका घेऊन कारवाई करणार आहेत. राहुल गांधी यांनी राजीनामा देताना जे पत्र लिहिले होते त्यामध्ये त्यांनी पक्षकार्याआड येणाऱ्या नेत्यांची नावे लिहिले होती त्यांच्यावर कारवाई करण्याचे सर्वात मोठे आव्हान सोनिया गांधी यांच्यासमोर असणार आहे. त्याचबरोबर राहुल यांच्याबरोबर असणाऱ्या युवा नेत्यांना योग्य ती जबाबदारी देणे आणि त्यांना विश्वासात घेऊन पक्षकार्याबरोबर त्यांना देखील बरोबर घेऊन चालणे.

त्याचबरोबर राहुल गांधी यांना देखील योग्य ती जबाबदारी देणे, जेणेकरून त्यांचा पक्षात देखील दबदबा राहील आणि पदाची प्रतिष्ठा देखील राहील. काँग्रेसबरोबरच समविचारी पक्षांना देखील पुन्हा एकदा बरोबर घेऊन त्यांना जिंकण्याचा विश्वास देणे हे देखील एक महत्वाचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर उत्तरप्रदेश सारख्या महत्वाच्या राज्याची जबाबदारी देऊन त्यांनी पक्षाचे संघटन मजबूत असलेल्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी संघटन अतिशय कमकुवत आहे त्या राज्यांवर देखील त्या विशेष लक्ष्य देणार आहेत. राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधींनी अध्यक्षपद सांभाळावे अशी वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांना हि जबाबदारी पुन्हा एकदा देण्यात आली आहे.

दरम्यान, अध्यक्षपद सांभाळल्यानंतर अवघ्या ४८ तासांत त्यांनी पक्षाच्या महत्वाच्या आणि वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सोनिया यांच्या कार्यकाळात राहुल गांधी समर्थकांना काय जबाबदारी मिळते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त