नेतृत्वाच्या वादादरम्यान अध्यक्ष पद सोडणार सोनिया गांधी, काँग्रेसला निवडावा लागेल नवा प्रमुख

नवी दिल्ली : सोनिया गांधी काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष पद सोडणार आहेत. मोठ्या कालावधीपासून काँग्रेसमध्ये पूर्णकालिन अध्यक्षपदाची मागणी होत आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या संदर्भाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सोनिया गांधी यांनी पक्ष सहकार्‍यांना सांगितले आहे की, त्यांनी एक वर्षासाठी अंतरिम अध्यक्ष म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे, आता त्यांना पार्टीच्या अध्यक्षपदावरून दूर व्हायचे असून पार्टीने नवा अध्यक्ष निवडला पाहिजे.

काँग्रेस वर्किंग कमिटी (सीडब्ल्यूसी) ची बैठक उद्या सोमवारी होत आहे. सूत्रांनी सांगितले की, ही बैठक संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आली आहे, परंतु शक्यता आहे की, सोनिया गांधी पुन्हा पद सोडण्याची इच्छा दर्शवतील आणि सदस्यांना सांगतिल की त्यांनी पक्षाचा नवा नेता निवडावा.

अमरिंदर सिंह यांनी केला विरोध
मोठ्या कालावधीपासून काँग्रेसमध्ये संघटनात्मक स्तरावर बदलाची चर्चा सुरू आहे. पार्टीच्या प्रमुख नेतृत्वासाठी काँग्रेस दोन भागात विभागल्याचे दिसत आहे. एक भाग पार्टी नेतृत्वासह संघटनेत मोठ्या प्रमाणात बदलाची मागणी करत आहेत, तर दुसरा गट गांधी कुटुंबाला आव्हान देणे चूक असल्याचे म्हणत आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाला आव्हान देण्यास विरोध केला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी रविवारी म्हटले की, ही वेळ अशाप्रकारचे मुद्दे उपस्थित करण्याची नाही. आता भारतीय जनता पार्टी (भाजपा) च्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या विरूद्ध मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, ज्यांनी देशाचे संविधान आणि लोकशाही उद्धवस्त केली आहे.