बैठकीनंतर सोनिया गांधींनी गुलाम नबी आझाद यांच्याशी केली चर्चा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – काँग्रेस कार्यसमितीची झालेली बैठक वादळी ठरली असून तब्बल सात तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवणार्‍या नेत्यांना सुनावण्यात आले. खासकरुन राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना लक्ष्य करण्यात आले. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघांनी गुलाम नबी आझाद यांच्याबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे.

काँग्रेस कार्यसमितीची बैठक संपल्यानंतर सोनिया गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या राहुल गांधी यांनी सुद्धा आझाद यांच्याबरोबर चर्चा केली आहे. पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावर वेगळी मते असलेल्या या 23 काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. पक्षामध्ये काही मुद्यांवर वेगळे विचार ठेवणार्‍या या 23 नेत्यांवर हे पत्र भाजपला पूरक असल्याचा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला. त्या पत्रावर स्वाक्षरी असलेल्या नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावला. बैठकीच्या समारोपात बोलताना सोनिया गांधी यांनी पत्रावरून आणि झालेल्या आरोप प्रत्यारोपावरून नाराजी व्यक्त केली. पत्र लिहिणार्‍या नेत्यांना विरोधी ठरवलेले नाही. आपण दुखावलो गेलो आहे, पण सगळे माझे सहकारीच आहे. झाले गेले सोडून द्या. आता पुन्हा एकदा नव्याने एकजुटीने कामाला सुरूवात करू, अशा भावना सोनिया गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.