राज्यपाल कोश्यारी अन् मुख्यमंत्री ठाकरेंच्या वादात कंगनाची उडी, अभिनेत्रीकडून शिवसेनेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत राज्यातील हॉटेल, बार उघडण्यात आले असून मंदिरे बंद का?, असा सवाल उपस्थित केला होता. तद्वतच, या पत्रातून राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करुन दिली आहे. राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत पत्रानेच प्रतिउत्तर दिले आहे. दरम्यान, या प्रकरणात कंगना राणावत ने सुद्धा आता उडी घेतली आहे.

राज्यपालांच्या पत्राला पाठींबा दर्शवत कंगनाने पुन्हा एकदा ठाकरे सेनेचा बाबर सेना असा उल्लेख केला आहे. कंगनाने ट्विट करत म्हटलं की, ‘माननीय राज्यपाल साहेबांनी गुंडा सरकारला प्रश्न विचारला आहे हे एकूण छान वाटले, गुंडानी बार आणि रेस्टॉरंट्स उघडले पण रणनीतिकदृष्ट्या मंदिरे बंद ठेली. सोनिया सेना बाबर सेनेपेक्षा वाईट वागणूक देत आहे.’ अशी टीका कंगनाने ठाकरे सरकारवर केली.

तथापि, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन कंगना राणावतने यापूर्वी मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर बोचरी टीका केली होती. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दात टीका करत शिवसेनेशी पंगा घेतला होता. त्याशिवाय, कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. दरम्यान, कंगनाने आता पुन्हा ठाकरे सरकारवर टीका केल्याने हा वाद पेटण्याची शक्यता आहे.