बडाेदा पोटनिवडणूक-2020 : ऑलिंपियन योगेश्वर दत्त निवडणूक रिंगणात ‘चीत’, काँग्रेसने केला पराभव

चंडीगढ : वृत्तसंस्था – हरियाणाच्या बडाेदा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी-जननायक जनता पार्टी आघाडीला मोठा झटका बसला आहे. येथून भाजप-जजपा उमेदवार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार इंदुराज नरवाल यांनी विजय मिळवला आहे. इंदुराज नरवाल यांनी भाजप-जजपा उमेदवार योगेश्वर दत्त यांना पराभूत केले. तिसर्‍या नंबरवर इनेलोचा उमेदवार होता.

बडाेदा सीटसाठी 20 राउंडपर्यंत मोजणी झाली. यामध्ये काँग्रेसला 60132 मते, भाजपला 50176, इनेलोला 4980 आणि लोक जनशक्ती पार्टीचे राजकुमार सैनी यांना 5595 मते मिळाली. अशावेळी सुमारे दहा हजार मतांनी काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला.

कोण-कोण होते मैदानात
बडाेदा हलकाच्या पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या दरम्यान सुरक्षेसाठी मोहाना येथील बिट्स कॉलेजमध्ये तयार करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रावर मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली होती. एकूण 14 टेबलवर 20 राउंडमध्ये मतमोजणी झाली. बरोदा पोटनिवडणुकीत भाजप-जजपा आघाडीकडून कस्तुपटू योगेश्वर दत्त, काँग्रेसकडून इंदुराज नरवाल, इनेलोकडून जोगेंद्र मलिक, लोसुपाकडून राजकुमार सैनी यांच्यासह 14 उमेदवार मैदानात होते.