दिल्लीला लागून असलेल्या ‘मुरथल’ येथील सुप्रसिद्ध सुखदेव ढाब्यातील 65 कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढतच आहेत. दरम्यान सोनीपतच्या मुरथलमध्ये एका प्रसिद्ध ढाब्यातील 65 कर्मचारी कोरोना संक्रमित असल्याचे आढळले आहे. बर्‍याच राज्यांमधून मोठ्या संख्येने लोक मुरथल येथे जेवणासाठी येतात. आपल्या चविष्ट पराठे व जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या मुरथलमध्ये कोरोनाच्या संकटामुळे ढाब्यांची चव आता लोकांसाठी संकट ठरत आहे कारण हरियाणाच्या सोनीपत येथे प्रसिद्ध सुखदेव ढाब्याचे 65 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुरथलमध्ये दररोज यूपी, दिल्ली, पंजाब, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधील हजारो लोक जेवायला येत असतात.

सोनीपतमध्ये कोरोनाचा कहर सातत्याने सुरूच आहे, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 191 नवीन प्रकरणे समोर आली असून त्यापैकी 65 नवीन प्रकरणे मुरथलच्या सर्वात प्रसिद्ध ढाबा सुखदेव येथून आले आहेत. दरम्यान आतापर्यंत सोनीपत जिल्ह्यात कोविड-19 मुळे 41 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

ढाब्यांवर नियमांचे पालन काटेकोरपणे केले जाईल: डीसी श्याम लाल

सोनीपतचे डीसी श्याम लाल पुनिया यांनी गेल्या 24 तासांच्या आकडेवारीविषयी माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 191 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 65 प्रकरणे सुखदेव ढाब्यातील आहेत. जिल्ह्यात आता 4,847 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण समोर आले आहेत. ढाब्यांवर आता काटेकोरपणे नियमांचे पालन केले जाईल, असे ते म्हणाले.

डीसी श्याम लाल यांनी सांगितले की मुरथल सुखदेव ढाबा सील करण्यात येईल. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यास उघडले जाईल. ढाबा पूर्णपणे सॅनिटाईझ केला जाईल. वेळोवेळी ढाबा मालकांनाही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आता सर्व ढाब्यांची कोरोना सॅम्पलिंग केली जाईल. सुखदेव ढाबा येथे मोठ्या संख्येने कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर प्रशासन कारवाईबाबत चर्चा करत आहे, परंतु सर्वात मोठी चिंता गेल्या अनेक दिवसांत सुखदेव ढाबा येथे जेवायला येणाऱ्यांची आणि या संक्रमित कामगारांच्या संपर्कात येणाऱ्यांची आहे. आता अशा लोकांना शोधणे प्रशासनाला खूप अवघड जाईल.