Pune News : सोनित सिसोलेकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार’ जाहीर !

पोलिसनामा ऑनलाईन – विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर केला जातो. यंदा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुण्यातील पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८वीत शिकणाऱ्या सोनित याची बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

दरम्यान, नासाच्या एका स्पर्धेत मंगळग्रहावरील माती लाल का झाली यासंबंधी पुण्यातील सोनित सिसोलेकर याने संशोधन सादर केले. यासह इतर स्पर्धांमध्ये त्याची चमक दाखविली, त्यामुळे त्याला राज्यपातळीवर, राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदकही मिळाले. त्याचा विज्ञानातील सातत्यपूर्ण कामगिरीला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

सोनितला लहानपणापासून दगडांची रचना, खडकांचे विविध प्रकार, पुण्यातील टेकड्या, मातीचा रंग अशा भोवतीच्या अनेक गोष्टींबद्दल जिज्ञासा आहे. त्याच्या याच कुतुहलाला पूरक वातावरण पालकांनी निर्माण केले. भवतालाच्या कुतुहलातून पडणाऱ्या या प्रश्‍नांची योग्य उत्तरे मिळाली तर हीच जिज्ञासा मुलाच्या सर्वांगीण प्रगतीची भाग बनते. इंडियन नॅशनल सायन्स अँड इंजिनिअरिंग फेअरमध्ये झाडांच्या वाढीबाबत आवाजाचा काय परिणाम होतो यावर संशोधन केले होते. या संशोधनासाठी मला राष्ट्रीय व राज्य पातळीवर सुवर्णपदक व रौप्यपदक मिळाले आहेत, असे सोनितने सांगितले.

सोनितचे वडील संतोष सिसोलेकर म्हणाले की, सोनित सध्या पुण्यातील व दख्खनच्या पठारावरील लाव्हा ट्यूब या विषयावर संशोधन सुरू आहे. यामध्ये पृथ्वीवरील लाव्हा ट्यूब आणि चंद्रावरील लाव्हा ट्यूब यांचा अभ्यास सुरू आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या लुणार प्लॅनेटरी सायन्स कॉन्फरन्समध्ये तो सहभागी होणार आहे. सोनितचे बाबा त्याला लहानपणी पुण्यातील टेकड्यांवर फिरायला घेऊन जायचे, तेव्हा तेथील दगडांकडे कुतूहलाने पाहात असत, त्यामध्ये काय आहे हे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. घरात त्याला खेळणी आणल्यावर तो ती तोडून त्याच्या आतमध्ये काय आहे हे उत्सुकतेने पहायचा. सोनितमधील हे वेगळेपण त्याच्या आई-बाबांनी हेरले. त्यादृष्टीने त्याला पूरक वातावरण निर्माण करून दिले. काही संशोधन त्याने थेट गुहांमध्ये जाऊन केले आहे. तर झाडांवरचे संशोधन करताना त्याने घरातच प्रयोगशाळा निर्माण केली होती.

कोरोनामुळे दिल्लीत कार्यक्रम होऊ शकला नाही. पण आज पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन संवाद साधला, त्यामुळे मी प्रेरित झालो असून, संशोधन क्षेत्रात ही माझी केवळ सुरुवात आहे. भविष्यात आणखी खूप पुढे जायचे आहे.
– सोनित सिसोलेकर