गुन्हे शाखेतील संतोष जगताप यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

सतत १५ वर्षे उत्तम सेवाभीलेख उत्तम राखल्याबद्दल सन्मानचिन्ह जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य पोलीस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापुर्ण सेवा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी १ मे रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी ८०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची यासाठी निवड केली जाते. यंदा जाहीर करण्यात आलेल्यांमध्ये पुणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असणारे संतोष विठ्ठल जगताप यांना सतत १५ वर्षे सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

संतोष जगताप सध्या पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. १ जुलै १९९४ रोजी पोलीस दलात भरती झालेले संतोष जगताप यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास केला आहे. यामध्ये १५ गंभीर गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. जगताप यांनी आपल्या सेवाकाळामध्ये गँगवॉर मधील कुख्यात गुन्हेगार, खुन, दरोडा, चोरी, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींची कौशल्याने माहितीकाढून आरोपींना गजाआड केले.

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या खराडी आयटी पार्क येथील नयना पुजारी हिच्यावर सामूहिक बलात्कार व खुनातील मुख्य आरोपी योगेश राऊत उपचारासाठी रुग्णालयात आणले असता फरार झाला होता. आरोपी योगेश हा दिल्ली, अमृतसर, सुरत, पोरबंदर, जयपूर येथे वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करत होता. आरोपीचे धागेदोरे नसताना देखील जगताप यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला शिर्डी येथून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

मण्णप्पुरम गोल्ड फायनांन्समधून चोरीला गलेले ३ कोटी ३९ लाख १४ हजार १३० रुपयांचे १७ किलो ५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला २४ तासात अटक करून गुन्हा उघडकीस आणला होता. या गुन्ह्यासाठी पोलीस आयुक्तांनी संतोष जगताप यांना बक्षीस देऊन गौरवले होते. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट अन्वेषण’ हे बक्षीस पथकाला मिळाले होते.

त्याचप्रमाणे आपल्या बातमीदरांकडून माहिती घेऊन त्यांनी ३४ पिस्टल व ११४ जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच २६ जबरी चोरीचे गुन्हे, १६ दरोड्याचे गुन्हे, २० खुनाचे गुन्हे, ३१५ घरफोडीचे गुन्हे असे एकूण ४३६ गुन्हे उघडकीस आणून ५ कोटी ४५ लाख रुपायांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या आत्तापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २४३ बक्षीसे मिळाली आहेत.