सोनू सूदने पाळला शब्द…पुण्याच्या आजीला सुरु करुन दिला मार्शल आर्ट्सचा ‘क्लास’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लाठ्या-काठ्या सफाईदारपणे फिरवणार्‍या आजीबाईंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काठ्यांचा खेळ सादर करणार्‍या या आजींचा व्हिडिओ अगदी अभिनेता रितेश देशमुखनेही शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने या आजीबाईंना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोनूने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दिलेला शब्द खरा करुन दाखवला असून त्याने आजीबाईंच्या मदतीसाठी मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवणारे प्रशिक्षण वर्ग सुरु करुन दिले आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफ्र असणार्‍या मानव मंगलानीने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये 85 वर्षीय शांताबाई पवार या सोनू सूदचे आभार मानताना दिसत आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनू सूद ने वॉरियर आजी शांताबाई पवार यांच्यासाठी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहे. या आजींचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

प्रवाशांसाठी देवदूत झालेल्या सोनूने या आजींनी इतर महिला आणि लहान मुलांना सेल्फ डिफेन्सचे धडे द्यावे या उद्देशाने हे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहे. सोनू सूदचे आभार मानण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे नाव सोनू सूद मार्शल आर्ट्स स्कूल ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाला लवकरच भेट देऊ असा शब्दही सोनूने दिला आहे. सोनूने सुरु केलेल्या या प्रशिक्षण वर्गाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी इन्स्टाग्रामवरुन सोनूचे कौतुक केले आहे. त्याच्यामुळे आजींना मदत होण्याबरोबरच महिलांना स्वत:च्या संरक्षणाचे धडे घेता येणार असल्याने आनंद द्विगुणीत झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.