सोनू सूदने शालेय मुलांना केले स्मार्टफोनचे वाटप

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमध्ये असंख्य स्थलांतरीत मजुरांची मदत करणारा अभिनेता सोनू सूद खर्‍या अर्थाने हिरो झाला आहे. त्याच्या मदतकार्यामुळे संपूर्ण देशात चर्चा आहे. आतापर्यंत सोनूने विविध माध्यमातून गरजूंची मदत केली असून आता त्याने मुलांच्या शिक्षणासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंचकूला येथील एका गावतील मुलांच्या शिक्षणासाठी त्याने स्मार्टफोन वाटले आहेत.

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाइन मुलांना शिकविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील राहणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी योग्य सोईसुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळेच सोनूने पंचकूलामधील मोरनी येथील एका गावातील शाळकरी मुलांमध्ये स्मार्टफोनचे वाटप केले आहे. ट्विट करत सोनू सूदने याविषयी माहिती दिली आहे. सगळ्या मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता यावे यासाठी स्मार्टफोन दिले आहेत. माझ्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे. पढ़ेगा भारत तभी तो बढ़ेगा भारत, असे ट्विट त्याने केले आहे.

मोरनी येथील कोटी गावातील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. त्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हते. काही मुलांना दररोज 4 ते 5 किलोमीटर दूर दुसर्‍या मुलांच्या घरी जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते. परंतु, सोनू सूदला याविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आणि चंदीगढमधील त्यांचा मित्र करण लूथरा यांनी संपर्क साधला. त्यानंतर या गरजू विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनचे वाटप केले आहे. त्यामुळेच या मुलांसह मीदेखील सोनू सूदचे मनापासून आभार मानतो, असे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक पवन जैन म्हणाले आहेत.