सौरव गांगुलीनं केलं रोहित-विराटचं कौतुक, पण म्हणाला – ‘टीमधील या खेळाडूला तोडच नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाने गेल्या दोन मालिकेत दमदार कामगिरी केली. प्रथम ऑस्ट्रेलियात आणि नंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवले. या दोन्ही मालिकेत अनेक दिग्गज खेळाडू संघात नसतानाही भारतीय खेळाडूंनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाच्या या कामगिरीवर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कौतुक केले.

गांगुली म्हणाले की, भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. पण एका खेळाडूने मला सर्वाधिक प्रभावित केले. भारतीय संघातील विकेटकिपर ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियात शानदार कमबॅक करत विजय मिळवून दिला. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या 2 कसोटीत तुफानी फलंदाजी करून सामन्याची दिशाच बदलून टाकली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत देखील या खेळाडूने सर्वांचे मन जिंकले. सर्वच खेळाडूंनी चांगली खेळी केली.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीचा मी आनंद घेतो. पण पंतने मला खरे वेड लावले. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी चांगली कामगिरी केल्याचे गांगुलीने म्हटले. पंतने इंग्लंडविरुद्धच्या 4 कसोटीत एका शतकासह 270 धावा केल्या. टी- 20 मध्ये त्याने 102 तर दोन वनडेत 155 धावा केल्या. यात 78 ही सर्वोच्च खेळी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 कसोटीत त्याने 274 धावा केल्या. 97 ही त्याची सर्वोत्तम खेळी असल्याचे ते म्हणाले.