अखेर सत्तास्थापनेचा ‘पेच’ सुटला ! शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा ठरला ‘फॉर्मुला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात चालू असलेल्या सत्तासंघर्षाचा पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे असे सूत्रांकडून समजते. मागील काही दिवसांपासून सत्तास्थापनेबाबत एकमत होत नव्हते त्यावर आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे किमान समान कार्यक्रमावर एकमत झाले असून सत्तास्थापनेचा फॉर्मुला देखील ठरला आहे असे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार असल्याचे समजते. मागील घटनांचा विचार केला तर लक्षात येईल की सत्तेसाठी सगळ्या पक्षांनी कंबर कसले होते. मात्र स्पष्ट बहुमत कुणीच सिद्ध न करू शकल्याने शिवसेनेने आपला मोर्चा मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे वळवला. २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच पर्याय खुले असल्याची भूमिका अवलंबली. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच वाढला आणि भाजपाच्या अडचणीत भर पडली. त्यानंतर सुमारे १९ दिवसांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेसाठी खलबतं सुरु होती. अखेर सत्तास्थापनेचा पेच सुटण्याच्या मागे आहे असे सूत्रांनी सांगितले.

विधानसभेत शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या असून सत्ता वाटप करण्यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात आला. त्यानुसार दर ४ आमदारांमागे १ मंत्रिपद अशी अट काँग्रेसने ठेवल्याचे समजते. यामुळे मंत्रिपदाचा नवीन फॉर्म्युला समोर आला आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्यमंत्रीपद हे अडीच-अडीच वर्ष वाटून घेतल्याचे देखील सूत्रांकडून कळाले. खरंतर सत्तासमीकरणासाठी अनेक राजकीय घडामोडी या मागील काही दिवसांपासून सुरु होत्या.

बुधवारपासून काय काय घडलं?
१) बुधवारी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची बैठक पार पडली.

२) या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली.

३) बैठकीतून काँग्रेस नेते उठून गेले आणि सोनिया गांधी यांना भेटले.

४) रात्री उशिरा सरकार स्थापनेसाठी आम्ही सकारात्मक आहोत असं आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं.

५) या बैठकीवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचंही लक्ष होतं.

६) बुधवारी उद्धव ठाकरे यांचीही सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा.

७) आज सकाळी संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट.

८) भेटीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

९) काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. या बैठकांमध्येच हा फॉर्म्युला ठरला असल्याचं समजतं आहे

शिवसेना आणि भाजपा यांच्यात ५०-५० चा फॉर्म्युला ठरत नसल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत सत्तास्थापनेचा निर्णय घेतला त्यामुळे एनडीएतून त्यांना बाहेर पडावं लागलं. मात्र सोनिया गांधी शिवसेनेसोबत जाण्यास तयार नसल्याने हा पेच वाढत गेला. अखेर शरद पवार आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींबरोबर सत्तास्थापनेबाबत अनेक बैठका घेऊन त्यांची सहमती मिळविली. त्यानंतर सगळ्या घडामोडी बदलल्या आणि सत्तास्थापनेसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. आता तर मंत्रिपदाचा देखील फॉर्म्युला तयार असून त्यास शिवसेनेने सहमती दर्शविली असल्याचे सूत्रांनुसार समजते.

Visit : Policenama.com