रेखाचा गंभीर आरोप, कमल हासननं जबरदस्तीनं केलं होतं KISS (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – साऊथ अ‍ॅक्ट्रेस रेखाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत रेखा कमल हासन सोबत Punnagi Mannan या सिनेमातील किसिंग सीनबद्दल बोलत आहे. रेखानं सांगितलं आहे की, तिला कोणतीही माहिती न देता हा सीन शूट करण्यात आला होता.

व्हिडीओत रेखा म्हणत आहे की, “हा किसिंग सीन मला न सांगताच शूट करण्यात आला होता. सुरेश कृष्णा आणि वसंत या सिनेमाचे असोसिएट डायरेक्टर्स होते. मी त्यांना म्हटलं होतं की, मला सीनबद्दल माहिती नव्हतं. त्यांनी मला सांगितलं की, असा विचार कर की, एखादा मोठा किंग एका लहान मुलाला किस करत आहे.”

पुढे रेखा म्हणते, “जेव्हा मी सांगत होते की, मला या सीनबद्दल काहीच माहिती नव्हतं तेव्हा कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतं. फक्त कमल हासन आणि युनिटलाच याबद्दल माहिती होतं.”

जेव्हा रेखाला विचारण्यात आलं की, फिल्म मेकर्स आणि कमल हासन यांनी तुझी माफी मागितली का ? तेव्हा रेखा म्हणाली, “ते का माफी मागतील. सिनेमा सुपरहिट झाला होता. यानंतर मला अनेक सिनेमे मिळाले. माफीचं तर मला माहिती नाही. परंतु ही एक फॅक्ट आहे की, तेव्हा किस करण्यासाठी मी होकार दिला नव्हता. त्यांनी अचानक सीन केला. आता हे संपलं आहे आणि मला हे परत पाहायचं नाही”

रेखा पुढे म्हणते, “परंतु सिनेमात कुठेही ते विचित्र किंवा अश्लील वाटलं नाही. हा सीन सिनेमात गरजेचा होता. जे व्हायचं होतं ते झालं आहे.”

रेखाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता लोक कमल हासन यांनी माफी मागावी अशी मागणी करताना दिसत आहेत.

रेखा जेव्हा या सिनेमाची शुटींग करत होती तेव्ही ती अवघ्या 16 वर्षांची होती. रेखाचा Punnagi Mannan हा सिनेमा 30 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. या सिनेमाचे डायरेक्टर बालचंद्र यांचं 2014 साली निधन झालं.

You might also like