गांजा पिताना पकडला गेला होता ‘हा’ आफ्रिकन क्रिकेटर, दारूच्या नशेत केले 175 रन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हर्शल गिब्सच्या नावावर अनेक मोठया रेकॉर्डची नोंद आहे. गिब्समुळेच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या ध्येयाचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम नोंदवला.

हर्शल गिब्स आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या वादांमुळे देखील चर्चेत राहिला आहे. १९ वर्षांपूर्वी याच दिवशी हर्शल गिब्स अँटिगामधील जॉली बीच रिसॉर्टमधील एका खोलीत गांजा पिताना पकडला गेला होता.

२००१ मध्ये शॉन पोलॉकच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ वेस्ट इंडिजची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी गेला होता.

११ मे रोजी रात्री हर्शल गिब्स अँटिगामध्ये गांजा फुकताना पकडला गेला. हर्शल गिब्ससह त्याचे सहकारी खेळाडू रॉजर टेलेमाकस, पॉल अ‍ॅडम्स, जस्टिन कॅम्प आणि आंद्रे नेल हे देखील होते.

एवढेच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रशिक्षक सदस्यही यात शामिल होते. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे तत्कालीन फिजिओ क्रेग स्मिथसुद्धा याचा एक भाग होते.

यानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने हर्शल गिब्ससह संघातील सर्व सदस्यांविरूद्ध कठोर कारवाई करत १० हजार दक्षिण आफ्रिकन रेंडचा दंड ठोठावला. हर्शल गिब्स फिक्सिंगच्या जाळ्यातही अडकला होता. २००० मध्ये हर्शल गिब्सला ६ महिन्यांसाठी निलंबित केले गेले होते.

हर्शल गिब्सने नशेत असताना १२ मार्च २००६ रोजी जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियममध्ये इतिहास रचला होता. एकदिवसीय इतिहासाच्या सर्वात मोठ्या ध्येयाचा यशस्वीपणे पाठपुरावा करण्याचा विक्रम आफ्रिकेच्या संघाने नोंदवला, यामुळे क्रिकेट चाहते अवाक झाले होते.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४३४ धावा केल्या होत्या, जो त्यावेळचा सर्वोत मोठा स्कोअर होता. मग एवढ्या मोठ्या स्कोअरनंतरही एखादा संघ हरू शकतो, असा विचार कोणी केलाही नसेल.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठे रेकॉर्ड

४३५ दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जोहान्सबर्ग, २००६
३७२ दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डर्बन, २०१६
३६१ इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, ब्रिजटाऊन, २०२९
३६० भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जयपूर, २०१३

दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा हिरो हर्शल गिब्स होता. ज्याने १११ चेंडूंमध्ये १७५ धावांची अविश्वसनीय खेळी खेळली. असे म्हणतात की, त्या सामन्या दरम्यान तो नशेत होता आणि नशेतच त्याने ती खेळी खेळली होती.

गिब्सने स्वत: खुलासा केला आहे की तो नशेत होता. गिब्जने आत्मचरित्र ‘टू द पॉईंट : द नो होल्ड्स-बार्ड’ मध्ये सांगितले आहे की, त्याने सामन्याच्या आदल्या रात्री खूप दारू घेतली होती आणि सामन्याच्या दिवशी हँगओव्हरमध्ये होता.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसीनेही आपल्या पुस्तकात याबाबत उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले, ‘झोपायच्या आधी मी माझ्या हॉटेलच्या खोलीबाहेर पाहिले की गिब्स तिथेच आहे. जेव्हा गिब्स सकाळी नाश्त्यासाठी आला होता, तेव्हाही तो नशेतच दिसत होता.

त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या १०५ चेंडूत १६४ धावा (9 षटकार, 13 चौकार) करत ४३४/४ रन केले होते. तेव्हा एकदिवसीय इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने ४०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. शेवटी या सामन्याचा निकाल आश्चर्यचकित करणारा ठरला.

हर्शल गिब्सची कारकीर्द १५ वर्षे चालली. वनडे क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये सलग ६ षटकार ठोकणारा हर्शल गिब्स एकमेव फलंदाज आहे.