… म्हणून डिविलियर्सला विश्वचषकासाठी संधी नाही, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये  सलग तीन पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेतील वाटचाल अवघड झाली आहे. महत्वाचे खेळाडू जखमी आणि मोठ्या प्रमाणात खराब असलेला खेळाडूंचा फॉर्म हि दक्षिण आफ्रिकेसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे डुबक्या समजल्या जाणाऱ्या बांग्लादेशकडून त्यांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. आजवर वर्ल्ड कपमध्ये सलग तीन मॅच पराभूत होण्याची आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे. क्रिकेटप्रेमींना आश्चर्य वाटेल. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डिव्हिलियर्सला आफ्रिकेच्या टीममधून खेळणे शक्य होते. डिव्हिलियर्सने टीम मॅनेजमेंटला तशी ऑफरही दिली होती. पण त्यांनी ती ऑफर धुडकावून लावली. दक्षिण आफ्रिकेची सद्यस्थिती पाहता आता निवड समितीला याचा पश्चाताप होत असणार. मात्र आता यावर दक्षिण आफ्रिका बोर्डाने खुलासा केला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना बोर्डाचे अध्यक्ष लिंडा झोंडी यांनी सांगितले कि, ‘फाफ डु प्लेसिसि आणि ओटीस गिब्सन यांनी डिविलियर्सची संघात येण्याची इच्छा १८ एप्रिलला आम्हाला सांगितली. त्यादिवशी आम्ही विश्वचषकासाठी संघ घोषित करणार होतो. ही गोष्ट आमच्यासाठी धक्कादायक होती.’ त्यामुळे लगेच निर्णय घेणे आमच्यासाठी शक्य नव्हते. तो ज्यावेळी निवृत्त झाला त्यावेळी आमच्या अनेक खेळाडूंना आम्ही संधी दिली होती, त्यामुळे त्यांनी यासाठी तयारी देखील केली होती, त्यामुळे त्याला जर संधी दिली असती तर त्या खेळाडूंवर अन्याय झाला असता. त्यामुळे ते विश्वचषकासाठी संघात स्थान मिळण्यास पात्र होते. आम्ही हा निर्णय तत्वांना धरुन घेतला होता. आम्हाला संघाशी, निवड समीतीशी आणि खेळाडूंशी न्याय रहायचे होते.

पुढे अधिक बोलताना त्या म्हणाल्या की, डिव्हिलियर्स जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे मात्र आम्हाला आमच्या तत्वांचे आणि नैतिकतेचे पालन करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे आमच्यासाठी हा निर्णय फार धक्कादायक नाही. याआधी आम्ही त्याला निवृत्त न होण्याचा सल्ला दिला होता,  मात्र त्याने आमचे काहीही न ऐकता आपण या निर्णयावर ठाम असल्याचे त्याने सांगितले होते, त्यामुळे एका वर्षानंतर त्याचे पुनरागमन फार अवघड गेले असते. या सगळ्याचा  विचार करून  आम्ही त्याला संघात न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.