Coronavirus : ‘या’ देशात चर्चमुळं फोफावला ‘कोरोना’ व्हायरस, आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू

सियोल : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस जगात मोठ्या वेगाने पसरत आहे आणि आता पीडितांची संख्या वाढून 92000 वर पोहचली आहे. इटली, इराण आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर चीनच्या बाहेर दक्षिण कोरिया एक असा देश आहे जेथे आतापर्यंत 33 मृत्यू झाले आहेत. दक्षिण कोरियामध्ये एका चर्चच्या बेजबाबदारपणामुळे हा व्हायरस पसरला आहे. या मृत्यूंनंतर चर्चचे संस्थापक ली-मन-ही आणि 11 अन्य लोकांविरूद्ध केस दाखल करण्यात आली आहे. ली यांचे म्हणणे आहे की, हा आजार भूताने पसरवला आहे. मात्र, नंतर त्यांनी मीडियासमोर येऊन माफी मागितली.

दक्षिण कोरियाने बुधवारी कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या 142 नव्या प्रकरणांना दुजोरा दिला, यामुळे संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 5328 झाली आहे. व्हायरसच्या संसर्गामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकुण संख्या 33 झाली आहे. साउथ कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (केसीडीसी) स्थानिक वेळेनुसार दिवसात दोन वेळा डाटा उपलब्ध करत आहे. व्हायरसचा संसर्ग मागच्या 13 दिवसात वाढला आहे. 19 फेब्रुवारी ते 2 मार्चदरम्यान 4304 नवी प्रकरणे समोर आली आहेत. येथे व्हायरस अलर्ट सर्वात उच्च स्तरावर लाल निशाणीपर्यंत पोहचला आहे. दाएगुमध्ये संसर्ग झालेल्या लोकांची संख्या वाढून 4006 वर पोहचली आहे. उत्तर ग्यांगसँगमध्ये 774 लोकांना संसर्ग झाला आहे.

काय आहे चर्चची भूमिका?
दक्षिण कोरिया प्रशासनाला आपल्या तपासात आढळले की, मागच्या महिन्यात शिन्चेऑन्जी चर्चच्या सदस्यांना कोरोना व्हायरसमुळे सभा न घेण्याची सूचना देण्यात आली होती. परंतु, चर्चच्या सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि येथूनच व्हायरस देशभरात पसरला. प्रशासनाचे म्हणणे आहे की, दक्षिण शहर दाएगूमध्ये या चर्चचे सदस्य एकत्र आले होते. आणि येथूनच या सदस्यांकडून कोरोना व्हायरस देशाच्या अन्य भागात पसरला.

दरम्यान, या चर्चने आता दुख व्यक्त केले आहे. एका सदस्याने बीबीसीशी बोलताना सांगितले की, आम्ही सर्वजण या प्रकरणामुळे खुप दुखी आहोत. चर्चवर आरोप आहे की, अनेक पीडितांना त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे माहिती होते, परंतु त्यांनी ही माहिती लपवली. याबाबतीत चर्चचे म्हणणे आहे की, ते सर्व घाबरत होते.

चर्चने स्पष्टीकरण देताना म्हटले की, आम्ही आमच्या सदस्यांच्या सुरक्षेबाबत चिंतीत होतो. म्हणून त्यांना हे जाहीर न करण्याचा सल्ला दिला होता. आता चर्च सरकारला पूर्ण सहकार्य करत आहे. सरकारने शिन्चेऑन्जी चर्चचे संस्थापक ली-मन-ही आणि 11 अन्य लोकांच्या विरूद्ध केस चालवण्यास सांगितले आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की, चर्चने कोरोना व्हायरसने प्रभावित लोकांना ट्रॅक करण्यात अडथळा आणला आणि याचा परिणाम देशातील सर्व लोकांना भोगावा लागत आहे.