चेन्नई : सुपरस्टार ‘विक्रम’चं घर बॉम्बने उडवण्याची धमकी

चेन्नई : वृत्तसंस्था – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार चियान विक्रम याचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवारी एका अज्ञाताने दिल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी शोध कुत्रे आणि बॉम्बविरोधी पथकांना पाचारण केले मात्र, काहीही आढळून आले नाही. त्यामुळे हा फोन दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

विक्रम चेन्नईच्या बसंत नगर येथे राहतो. सोमवारी सकाळी पोलीस नियंत्रण कक्षात एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला ज्याने विक्रमच्या घरात बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली. यामुळे गोंधळ उडाला. तिरुवनमियूर ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आणि एक स्निफर कुत्र्यासह विक्रमच्या घराची झडती घेतली. घराची संपूर्ण तपासणी केल्यानंतर पोलिसांनी तो दिशाभूल करणारा कॉल असल्याचं स्पष्ट केलं. तसंच अधिकाऱ्यांना कॉल ट्रेस करण्याचेही आदेश दिले. तपासात विल्लुपुरममधील एका व्यक्तीने धमकी देऊन हा फोन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कलाकारांसह मुख्यमंत्र्यानाही यापूर्वी धमक्या
कलाकारांना धमक्यांचे फोन येणे हि काही नवी गोष्ट नाही. विक्रमच्या आधी विजय, अजित, सूर्या, विजयकांत आणि रजनीकांत यांनाही असेच कॉल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे विल्लुपुरमच्या मराक्कनममधील एका मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीने तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी आणि इतर अनेक कलाकारांना बॉम्ब असल्याची धमकी दिली होती. नंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी माफीही मागितली होती. आता या प्रकरणातही तीच व्यक्ती असू शकते असा पोलिसांचा संशय आहे.

चियान विक्रम सध्या अजय ज्ञानमुथु दिग्दर्शित आगामी कोब्रा सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची वाट पाहत आहे. कोरोना साथीमुळे या सिनेमाचं रशियातलं चित्रीकरण थांबवावं लागलं होतं. कोब्रा सिनेमात माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण, श्रीनिधी शेट्टी, केएस रवी कुमार, बाबू अँथनी, रोशन मॅथ्यू आणि मिरनलिनी रवी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी तो दिग्दर्शक राजेश एम सेल्वा यांच्या कदरम कोंडन सिनेमात दिसला होता.