मोदी सरकार देतंय 2000 रूपयांनी स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोल्ड बॉण्डच्या चालू आर्थिक वर्षातील पाचवी मालिका आज ७ ऑगस्ट रोजी संपत आहे. याचा अर्थ या योजनेत पैसे गुंतवण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आरबीआयने सॉव्हरेन गोल्ड बॉण्डची इश्यू प्राईस ५,३३४ रुपये प्रति ग्राम निश्चति केली आहे. म्हणजेच तुम्ही या भावात सोने खरेदी करू शकता. या बॉण्डसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि पैसे भरणाऱ्या लोकांना प्रति ग्रॅमच्या हिशोबाने ५० रुपये सवलत मिळेल. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉण्डची इश्यू प्राईस ५,२८४ रुपये प्रति ग्राम असेल. सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजना २०२०-२१ मालिका-५ चे सब्स्क्रिप्शन ३ ऑगस्टपासून सुरु झाले होते.

गोल्ड बॉण्डचा पाचवा आठवडा अशा वेळी सब्स्क्रिप्शनसाठी उघडला गेला, जेव्हा यावर्षी किंमतीत ३७ टक्के वाढ झाली आणि सोन्याचा भाव ५४,००० प्रति १० ग्रामवर गेला आहे. आरबीआय भारत सरकारच्या वतीने हा बॉण्ड जारी करत आहे. आरबीआयनुसार, बॉण्डची किंमत ९९.९ शुद्ध सोन्यासाठी गेल्या ३ व्यापार दिवसात सरासरी बंद किंमतीवर (इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने प्रकाशित केलेली) आधारित आहे.

इतके सोने खरेदी करू शकता
सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजनेअंतर्गत सोने खरेदीचे काही नियम आहेत. या योजनेत कोणतीही व्यक्ती एका व्यवसाय वर्षात जास्तीत जास्त ५०० ग्रॅम गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकते. या बॉण्डमधील किमान गुंतवणूक १ ग्रॅम आहे. त्याच्या गुंतवणूकदारांना करातही सूट मिळते. या योजनेद्वारे गुंतवणूकदार बँकेतूनही कर्ज घेऊ शकतात.

२.५ टक्के परताव्याची हमी
गोल्ड बॉण्डमध्ये सोन्यातील तेजीचा फायदा होतो. यावर वर्षाकाठी २.५ टक्के व्याजही मिळते. व्याज दर ६ महिन्यांनी गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाईल. अंतिम व्याज मूळ रकमेच्या परिपक्वतेवर दिले जाते. मॅच्युरिटी पिरियड ८ वर्षे आहे. पण ५ वर्ष, ६ वर्षे आणि ७ वर्षांचा देखील पर्याय आहे. सोन्याचा बाजारभाव खाली आला, तर भांडवलाचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

गोल्ड बॉण्ड योजनेशी संबंधित काही विशिष्ट गोष्टी
गोल्ड बॉण्डची ही मालिका इश्यू करण्याची तारीख ११ ऑगस्ट २०२० असेल. गोल्ड बॉण्डची मुदत ८ वर्ष असते. यात तुमच्याकडे पाचव्या वर्षानंतर बाहेर पडण्याचा पर्याय असतो. गोल्ड बॉण्डची विक्री बँका, नियुक्त पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून थेट किंवा त्यांच्या एजंटद्वारे केली जाते. कोणतीही व्यक्ती कमीतकमी १ ग्रॅमचा गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकते.