समाजवादी पार्टीचे नेते व खासदार आजम खान ‘लॅन्ड माफिया’ म्हणून घोषित, आत्‍तापर्यंत १३ FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार आजम खान यांना रामपूरमध्ये भू माफिया घोषित करण्यात आले आहे. जौहर विश्वविद्यालयातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याप्रकरणी प्रशासनाने त्यांना लॅन्ड माफिया घोषित केले आहे.

एका खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी आन्जनेय कुमार सिंह यांनी आदेश दिले आहेत कि, अशा प्रकारे जमिनीवर कब्जा करणारे आणि अनधिकृतपणे जमीन लाटणाऱ्या सर्वांना भू माफिया घोषित करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्यांनी अशा प्रकारे अवैधरित्या जमिनींवर कब्जा केला आहे आणि त्या सोडण्यास तयार नाही आणि ज्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आहेत त्या सर्वांना भू माफिया घोषित केले जाणार आहे. सरकार देखील यावर नजर ठेवून असणार आहे.

लॅन्ड माफिया पोर्टलवर आजम खान यांचे नाव –

उपजिल्हाधिकारी सदर प्रेम प्रकाश तिवारी यांनी याविषयी सांगितले कि, आजम खान यांचे नाव भू माफिया पोर्टलवर नोंदवले गेले आहे. नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल. आजम खान यांच्याविरोधात एका आठवड्यात १३ जमिनींवर कब्जा केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये १२ जुलै रोजी स्थानिक प्रशासनाने देखील एक गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये २६ शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवताना म्हटले होते कि, आजम खान यांनी जबरदस्ती या शेतकऱ्यांच्या जमिनी जौहर यूनिवर्सिटीमध्ये घेतल्या आहेत.

२६ शेतकऱ्यांच्या तक्रार –

या प्रकरणात पोलिसांमध्ये आले हसन या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याचा मुलगा आणि पत्नीवर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याआधी १ जून रोजी रोजी आजम खान आणि मुख्य सुरक्षा अधिकारी आले हसन याच्यावर देखील पाच हेक्टर सरकारी जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात २६ शेतकऱ्यांनी देखील आजम खान यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यामध्ये १२ शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला असून १४ शेतकऱ्यांच्या तक्रारीवर गुन्हा नोंदवण्याचे काम चालू आहे.

दरम्यान, आझम खान यांच्या गुन्ह्यांवर तपास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय पाल शर्मा यांनी दिली आहे. पूर्णपणे निष्पक्ष तपासणी करण्यात येणार असून कुणालाही माफ केले जाणार नाही.

You might also like