‘सपा’चे आमदार अबू आझमी यांची आदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयात घोषणाबाजी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या समाजवादी पक्षाला आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली. सपाचे आमदार अबू आझमी यांनी बुधवारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मानखुर्द येथील एस.एम.एस. कंपनी बंद करावी या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं.

यावेळी बोलतान अबी आझमी म्हणाले, “ठाकरे सरकारला आम्ही पाठिंबा देऊनही ते आमचं काम ऐकत नाहीत. साधा फोनही उचलत नाहीत. आदित्य ठाकरेंना वारंवार फोन केला मात्र ते फोनही घेत नाहीत. त्यामुळं नाराज होऊन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आदित्य ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचंही” आझमी यांनी यावेळी सांगितलं.

बाबरी खटल्याच्या निकालावरही अबू आझमींनी केलं भाष्य

अबू आझमी म्हणाले, “देशाच्या लोकशाहीसाठी आजचा काळा दिवस आहे. 1992 मध्ये बाबरी मशीद जबरदस्तीनं पाडण्यात आली. संपूर्ण जगानं ते पाहिलं. हा खटला अनेक वर्षांपासून सुरू आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे. परंतु जेव्हापासून दिल्लीत मोदी सरकार आलं आहे तेव्हापासून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, पोलीस यांना मोदी आणि अमित शाहांनी बाहुले बनवले आहे. बाबरीचा निकाल आला तेव्हा न्यायाधीशांनी सांगितलं बाबरी मशीद पडली ते चुकीचं झालं. परंतु इतकी मोठी मशीद पडले त्यात पुरावे मिळाले नाहीत. आता या देशात हेच होणार आहे” असा आरोपही अबू आझमींनी केला.