पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना ‘स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड’ मिळाला असून, दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री (पीएमओ) डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पातळीवरील मनाचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

हरवलेली मुले आणि मानवी व्यापार संबंधित गुन्ह्यांचा तपास” याबाबत राज तिलक रौशन यांनी राबवलेल्या प्रकल्पाला, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( FICCI ) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

हरवलेली मुले आणि त्यांचा मानवी व्यापारा साठी केला जाणारा वापर (ह्यूमन ट्राफेकिंग) या बाबतीतच्या गुन्ह्या वर आळा बसवण्यासाठी, वेगाने आणि सक्षम तपास करून गुन्हेगारांना शिक्षा होणे गरजेचं आहे. त्यासाठी तपास अधिकाऱ्याना उपायोगी पडेल अशी, शास्त्रीय पद्धतीची, एस ओ पी -स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, राज तिलक रौशन यांनी विकसित करून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच संदर्भात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

2013 च्या बॅच चे आय पी एस अधिकारी असणाऱ्या राज तिलक रौशन यांनी वसई-विरार, नागपूर या ठिकाणी काम करताना त्यांनी हरवलेल्या मुलांच्या 600 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा शोध घेत गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. त्यावर त्यांनी तयार केलेल्या प्रकल्पास पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव राष्ट्रीय पातळीवर झाला आहे.

कडक शिस्तीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जाणारे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत निर्माण केलेली एस. ओ. पी. यापुढे अनेक तपास अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे राज्यभरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.