‘डरना मत, कहना मेरा भाई एसपी है’ : पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सायबर स्टॉकिंगला महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. सामाजिक माध्यमांच्या वापराबाबत महिलांना त्यांचे अधिकार माहिती असणे आवश्यक आहे. तुमची शांतता, सुरक्षितता, मानसिक स्वास्थ हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तुमच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सदैव सज्ज आहे. कोणी तुम्हाला त्रास देत असल्यास निर्भय होऊन पोलिस यंत्रणेची मदत घ्या. कोणालाही घाबरू नका. डरना मत, कहना मेरा भाई एसपी है अशा शब्दात पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महिलांना आश्वस्त केले.

महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी सुरक्षा विषयक कायद्यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर सेलचे विशेष पोलिस महानिरिक्षक यांच्या आदेशाने सायबर सेफ वुमेन मोहिमेतंर्गत पोलिस मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून अधीक्षक शर्मा बोलत होते. प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर संगीता खोत उपस्थित होत्या.
यावेळी अधीक्षक शर्मा म्हणाले, महिलांसाठी 1091 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू आहे. तसेच सर्व पोलिस ठाण्यामध्ये सखी हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. निर्भया पथके सक्षमपणे कार्यरत आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत सायबर सेल मदतीसाठी तत्पर आहे. महिलांनी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तेंव्हा यांची मदत घ्यावी, असे आवाहन शर्मा यांनी यावेळी केले.

सामाजिक माध्यमांचा वापर सजकतेने व दक्षतेने करण्याचे आवाहन करून आपले पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. पासवर्ड निवडताना वैशिष्टपूर्ण अक्षरांचा वापर करा. फेसबुकच्या खात्यामध्ये पब्लिक अक्सेस देऊ नका. अनोळखी प्रोफाईलवर संभाषण करू नका असे सांगून व्हॉटस्ॲप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास त्यांची जबाबदारी ग्रुप ॲडमिनवर निश्चित करण्यात येईल याची जाणीवही शर्मा यांनी करून दिली.

या कार्यक्रमात सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष म्हणाले, दिवसेंदिवस समाजमाध्यमांचा वापर वाढत असून सायबर क्षेत्रात महिलांबाबत असुरक्षितता वाढली आहे. प्रोफाईल हॅकिंग, लिंक बेटींग, ऑनलाईन शॉपींग, सायबर स्टेकींग, सायबर बुलींग यासारख्या बाबींना महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत त्यामुळे बदलत्या काळात महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून समाजमाध्यमांचा अधिक दक्षतेने वापर करावा.

ॲड. मुक्ता दुबे यांनी महिलांवरील अत्याचार व त्यासंबधात असणाऱ्या कायद्यांबाबत, न्यायिक प्रक्रियेबाबत माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी आभार मानले. यावेळी बार असोशिएशनच्या महिला सचिव ॲड. मुक्ता दुबे, सायबर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, पोलीस हेडकाँस्टेबल सिध्दार्थ कांबळे, मराठा सेवा संघ उद्योजक कक्ष अध्यक्षा तेजस्विनी सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/