पोलिस अधीक्षक सुहेल शर्मांनी दिली सांगलीला ‘दिशा’, 2 वर्षांचा यशस्वी कालखंड

अनेक उपक्रमांसह केले पोलिस दलाचे आधुनिकीकरण

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या जिल्ह्यातील कारकिर्दीला शनिवारी दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आहे. गेल्या दोन वर्षांत शर्मा यांनी जिल्हा पोलिस दलाला चांगली ‘दिशा’ दिली आहे. पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यापासून, सुरक्षित शहर, मोका, हद्दपारी, स्थानबद्धता कारवाईचा प्रभावी वापर, एम पोलिस अ‍ॅप, अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज वाहने याद्वारे पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावरही त्यांनी भर दिला. अधीक्षक शर्मा यांच्या दोन वर्षांच्या कालावधीचा घेतलेला हा आढावा…

सांगली शहर पोलिस ठाण्यात अनिकेत कोथळेचा पोलिसांनीच खून केल्यानंतर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणाने पोलिसांची प्रतिमा मलीन झाली होती. याप्रकरणी उपनिरीक्षकासह पोलिसांना अटकही करण्यात आली. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील पोलिसांचे मनोधैर्य खचले होते. पोलिसांच्या कार्यात मरगळ आली होती. अशा बिकट परिस्थितीत 23 नोव्हेंबर 2017 रोजी अधीक्षक शर्मा यांनी पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. आदेशानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली.

सुरुवातीला त्यांनी पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम केले. हळूहळू पोलिसांची प्रतिमा चांगली बनवण्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी धडक कारवाईला सुरुवात केली. गेल्या दोन वर्षात 23 टोळ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. 150 हून अधिक जणांना हद्दपार करण्यात आले. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या नामचीन गुंडांना अटक करण्यात आली. शेकडो अग्नीशस्त्रे जप्त करण्यात आली. या दोन वर्षांच्या काळात महापालिका, लोकसभा, विधानसभा तसेच जिल्ह्यातील विविध पालिकांच्या निवडणुका पार पडल्या. मात्र शर्मा यांच्या पूर्वनियोजनाने त्या शांततेत पार पडल्या.

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह त्यांनी पोलिस दलाच्या सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणाला प्राधान्य दिले. त्यांच्या अभियंत्याच्या दृष्टिकोनातून शंभराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. बेसिक पोलिसिंगवर भर देण्यासाठी ठाण्यांच्या हद्दीत पोलिस मदत केंद्रे सुरू करण्यात आली. तेथे पोलिसांचा वावर वाढल्याने घरफोडी, चोरी, चेन स्नॅचिंग अशा अनेक घटनांना आळा बसला. मटका, जुगार, गांजा विक्री करणार्‍यांवर कारवाया करून त्यांच्या टोळ्या हद्दपार करण्यात आल्या. शहरांतील वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी लेफ्ट फ्री सुरू करण्यात आले. ई-चलन प्रक्रिया राबवण्यात आली. एम-पोलिस अ‍ॅपद्वारे पोलिसांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. पोलिसांच्या शंका, तक्रारी ऑनलाईन सोडवण्यावर शर्मा यांनी भर दिला आहे.

ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरावेळी प्रशासनावर टीका होत असताना अधीक्षक शर्मा यांच्यासह त्यांचे पूर्ण पोलिस दल पुराच्या पाण्यात जाऊन पूरग्रस्तांना मदत करीत होते. स्वतः शर्मा यांनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन पूरग्रस्तांना धीर तर दिलाच शिवाय शक्य ती मदतही पोहोचवली. या दोन वर्षांच्या काळात अयोध्या निकाल, गणेशोत्सव, मोहरम, ईद, नवरात्र या उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सलग दोन वर्षे जिल्हा डॉल्बीमुक्त करण्यातही शर्मा यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

महत्वाकांक्षी दिशा प्रकल्प आदर्शवत
गुन्हेगारी क्षेत्रात नुकत्याच आलेल्या युवकांचे, अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करून, त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अधीक्षक शर्मा यांनी दिशा प्रकल्प सुरू केला आहे. दोन वर्षात या प्रकल्पात 65 युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातील 20 युवकांना चांगल्या ठिकाणी नोकरीही मिळाली आहे. त्यांच्यावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसून, गुन्हेगारी प्रवृत्तीपासून त्यांना परावृत्त करणे तसेच त्यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त व्हावे यासाठीच शर्मा यांनी दिशा प्रकल्प सुरू केला. त्याच्या प्रतिसादामुळे त्यांनी राज्यात एक नवा आदर्श घालून दिला आहे.

Visit : Policenama.com