‘या’ अमेरिकन अब्जाधीशानं खरेदी केलं SpaceX चं अवकाश यान, मुलांना होईल त्याचा फायदा, ‘कसा’ ते जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्पेसएक्सने एक नवीन मिशन सुरू केले आहे. त्याचे नाव इन्स्पिरेशन-4 मिशन असे आहे. या मिशन अंतर्गत चार जणांना पृथ्वीच्या कक्षेत अवकाशात प्रवास करण्यासाठी पाठवले जाईल. या प्रवासासाठी अमेरिकन अब्जाधीशाने स्पेसएक्सच्या संपूर्ण फ्लाइटलाच खरेदी केले आहे. आतापर्यंत लोकांनी उड्डाणासाठी विमान खरेदी करण्याचे ऐकले असेल पण प्रथमच अंतराळ यान खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. चला जाणून घेऊया स्पेसएक्सची फ्लाइट खरेदी करण्यामागे अब्जाधीशाचा काय हेतू आहे?

स्पेसएक्स (SpaceX) या वर्षाच्या शेवटच्या चार महिन्यांत आपले पहिले नागरी उड्डाण अवकाशात पाठवेल. यासाठी फाल्कन-9 (Falcon-9) रॉकेट आणि ड्रॅगन कॅप्सूल (Dragon Capsule) वापरण्यात येणार आहेत. इन्स्पिरेशन-4 असे या मिशनचे नाव आहे.

अमेरिकन अब्जाधीश जॅरेड आयझॅकमॅन (Jared Isaacman) यांनी यासाठी सर्व खर्च दिला आहे. इतकेच नाही तर त्यांनी आणखी तीन प्रवासी आपल्या बरोबर घेण्याचे ठरविले आहे. या प्रवासात अगदी सामान्य लोकांना अवकाशाची यात्रा करवण्याची जबाबदारी आहे. जॅरेड यांना या प्रवासाच्या माध्यमातून सेंट जूड चिल्ड्रन रिसर्च हॉस्पिटलसाठी 200 मिलियन डॉलर्स म्हणजेच 1459 कोटींचा निधी जमा करायचा आहे. त्यातील निम्मी रक्कम ते स्वत: देणार आहेत.

त्यांच्या बरोबर अंतराळ प्रवासात जाण्यासाठी त्यांनी या रुग्णालयातील एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याची निवड देखील केली आहे. जे लोक या रुग्णालयाला फेब्रुवारीपर्यंत देणगी देतील त्यांच्यापैकी एकाला तिसरी जागा आणि चौथी जागा त्या व्यावसायिकाला मिळेल जो शिफ्ट 4 पेमेंटचा उपयोग करत असेल. जॅरेडच्या कंपनीचे नाव शिफ्ट 4 पेमेंट आहे. जॅरेड याव्यतिरिक्त टेक आणि फायटर जेट्सचा व्यवसाय देखील करतात.

जॅरेड आयझॅकमॅन (Jared Isaacman) म्हणाले की, मला पुढील 50 ते 100 वर्षे पृथ्वीवर जगायचे आहे. जेणेकरुन मला तो नजारा पाहायला मिळेल की जेव्हा लोक आपल्या रॉकेटसह उड्डाण करत असतील. सुट्ट्या घालवण्यासाठी लोक चंद्रावर जात असतील. मुले स्पेससूट परिधान करुन शाळेत जातील. मला हे माहित आहे आणि अशा बर्‍याच लोकांना माहित आहे की आपण भविष्यात अशा जगात प्रवेश करणार आहोत.

जेव्हा जॅरेड आयझॅकमॅन यांना फ्लाइट खरेदीबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की जेव्हा आपण मुलांना कॅन्सरपासून दूर ठेवू शकू, तेव्हाच मी तो भविष्यकाळ पाहू शकेन. ज्याची मी आता कल्पना केली आहे. या यात्रेतून जमा झालेला पैसा सेंट जूड चिल्ड्रन रिसर्च हॉस्पिटलला दिला जाईल जेणेकरून ते मुलांच्या कॅन्सरचा उपचार करू शकतील.

जॅरेड आयझॅकमॅन शक्यतो ऑक्टोबर महिन्यात स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलने आपल्या प्रवासाची सुरुवात करतील. उर्वरित प्रवाशांची पुढील आठवड्यात निवड होईल. यानंतर या लोकांना ड्रॅगन कॅप्सूल उडवण्याची आणि पृथ्वीच्या कक्षेत सर्व्हायव्हलचे प्रशिक्षण दिले जाईल. स्पेसएक्सचे मालक एलन मस्क म्हणाले की, ही जगातील पहिली खासगी अवकाश यात्रा असेल, जी मुलांच्या हितासाठी असेल.

जॅरेड आयझॅकमॅन आपल्या प्रवासाचे स्वत: कमांडर असतील. ते सध्या स्पेसएक्सच्या कार्यालयात ड्रॅगन कॅप्सूल आणि फाल्कन -9 रॉकेटशी संबंधित बारीक सारीक गोष्टी शिकत आहेत. अधिक माहिती म्हणजे ड्रॅगन कॅप्सूल स्वयंचलितपणे उडते. परंतु पायलटला हे माहित असावे जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत त्यास तो हाताळू शकेल.