Coronavirus : चिंताजनक ! ‘कोरोना’मुळं स्पेनमध्ये दिवसात 700 हून अधिक बळी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे. त्यामुळे स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या बुधवारी एकाच दिवसात सातशेहून अधिकने वाढली आहे. तेथील बळीची संख्या चीनहूनही अधिक झाली असून, तो आता इटलीनंतर जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

स्पेनमध्ये एकाच दिवसात 738 हून अधिक बळी गेल्याने तेथील मृत्यूसंख्या 3 हजार 434 झाली आहे. त्यामुळे 3 हजार 285 बळी गेलेल्या चीनला स्पेनने मागे टाकले आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. त्या देशातील करोनाग्रस्तांची संख्या 20 टक्क्यांनी वाढून 47 हजार 610 झाली असून, 5 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत.

स्पेनच्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा दबाव आला असून, हॉटेल्सचे रूपांतर रुग्णालयांत करण्यात येत आहे, तर बर्फाच्या एका स्केटिंग रिंकचा शवागासारखा वापर करण्यात येत आहे. देशातील संचारबंदी 12 एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी केली आहे. ब्रिटिश राजघराण्याचे वारस असलेले 71 वर्षांचे प्रिन्स चार्ल्स यांच्यातही कोरानाची सौम्य लक्षणे आढळली असून त्यांनी स्कॉटलंडमधील राजघराण्याच्या एका वास्तूत स्वत:ला विलग केले आहे. दुसरीकडे मात्र, त्यांची पत्नी कामिला यांची चाचणी नकारात्मक आली आहे.