काय सांगता ! होय, स्पेनच्या ‘या’ महिला मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीननंतर आता कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. स्पेनच्या समानता मंत्री आयरिन मॉन्टेरो देखील कोरोना विषाणूने बाधित झाल्या आहेत. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार मॉन्टेरो यांना त्यांचे सहकारी आणि उपपंतप्रधान पाब्लो इग्लेसिअस यांच्यापासून अलिप्त ठेवण्यात आले आहे. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की आता सरकारमधील सर्व सदस्यांची तपासणी केली जाईल. एवढेच नव्हे तर दिवसा तपासणीचे निकाल प्रसिद्ध केले जातील असेही संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जाहीर केले आहे की ते मार्चमध्ये आपले कार्यक्रम लहान स्तरावर आयोजित करतील.

विशेष म्हणजे मार्च महिन्यात होणाऱ्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद हे चीनकडे असणार आहे. चिनी राजदूत झांग जुन म्हणाले की, विषाणूपासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी आम्ही अधिक चांगल्या स्थितीत असू. तथापि, सुरक्षा परिषदेचे कोणतेही अधिवेशन रद्द होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तथापि, चीनने प्रतिनिधी मंडळाचा आकार कमी करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांचा १५ ते १६ मार्च रोजीचा दौरा रद्द करण्यात आला आहे. या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार होती.

चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या घटना झपाट्याने कमी होताना दिसत आहे. चीनच्या अधिकृत निवेदनानुसार, बुधवारी या विषाणूमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह, चीनमध्ये या विषाणूमुळे मृतांचा आकडा ३,१६९ वर पोहोचला आहे. बुधवारी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे एकूण १५ नवीन प्रकरणे समोर आली. हुबेई प्रांत आणि वुहानमध्ये पहिल्यांदा एका दिवसात सर्वात कमी प्रकरणांची नोंद झाली असून बुधवारी ८ नवीन प्रकरणे नोंदली गेली.