‘स्पेशल 26’ स्टाइलमध्ये रॉ अधिकारी बनून व्यापार्‍याकडं गेले भामटे, केलं ‘हे’ प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका व्यावसायिकाच्या अपहरणाचे प्रकरण समोर आले. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. पाच आरोपींनी रॉ (इंटेलिजेंस डिपार्टमेंट) चे अधिकारी बनून एका औषध डीलरच्या दुकानात घुसून त्यांचे अपहरण केले. ‘स्पेशल २६’ चित्रपटाच्या धर्तीवर ही घटना घडवून आणल्याचे समजते.

या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच गुन्हेगारांनी प्रथम रॉ अधिकारी बनून पिंटू गुप्ताचे अपहरण केले आणि त्यानंतर सात लाख रुपयांची खंडणी मागण्यास सुरवात केली. या व्यावसायिकाच्या अपहरणाची बातमी समजताच यूपी पोलिसांनी त्वरित कारवाई केली. पोलिसांना खबऱ्याकडून व्यापाऱ्याला लपवून ठेवल्याची बातमी मिळाली तेव्हा ३ पथकांमार्फत पोलिसांनी कलेक्टरगंजमधील सीपीसी गुड्स वेअरहाऊसवर छापा टाकला. जिथून त्यांची अपहरणकर्त्यांशी चकमक सुरू झाली. चकमकीच्या वेळी अपहरणकर्ते व्यापारी पिंटू गुप्ता यांच्यासह पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता त्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर, पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले, त्यावेळी स्वत:ला रॉ ऑफिसर म्हणवणार्‍या एका आरोपीच्या पायाला गोळी लागली आणि तो खाली पडला.

पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून व्यावसायिकाला सुखरूप वाचविण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक बंदूक, तीन जिवंत काडतुसे, तीन मोबाइल फोन आणि एक स्कूटी जप्त केली. तसेच पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेतला असता त्यांच्याकडून ‘रॉ’ची (गुप्तचर विभाग) बनावट कार्डेही जप्त केली. व्यापारी अपहरण प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपी सत्येंद्र कुमार उर्फ सत्य प्रकाश, मोहम्मद फैसल, बाचा, सूरज जयस्वाल आणि मोहम्मद काशिफ यांना अटक केली असून त्यांची तुरूंगात रवानगी केली आहे.