शिवसेनेचे अरविंद सावंत, रविंद्र वायकर यांच्या विशेष नियुक्त्या रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आणि माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या विशेष नियुक्त्या रद्द करण्याची नामुष्की ठाकरे सरकावर आली आहे. खासदार सावंत यांनी युतीतून बाहेर पडल्यानंतर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तरी रविंद्र वायकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे विशेष नियुक्त्या करत दोन्ही नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले होते.

खासदार अरविंद सावंत आणि रविंद्र वायकर यांच्या विशेष नियुक्त्या केल्या. मात्र दोन्ही लाभाची पदं असल्याचा आरोप होत असल्याने त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी तर वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्यांवरून अधिवेशनात विरोधकांकडून कोंडी होण्याआधीच त्यांचे राजीनामे घेण्यात आले होते. ऑर्डर काढून या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सावंत आणि वायकर यांच्या नियुक्त्या रद्द झाल्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज झाले आहेत. शिवसेनेचे नेते मुख्य सचिवांवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. सचिवांनी नियुक्त करण्याआधी या त्रूटी का कळवल्या नाहीत ? असा प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.