पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी पोलिसांची ‘खास व्यवस्था’

जोधपुर: वृत्तसंस्था- लग्नाला घरच्यांचा विरोध असल्यानंतर प्रेमीयुगल पळून जाऊन लग्न करतात. घरच्यांच्या विरोधात जाऊन सात फेरे घेत आपला संसार थाटतात. मात्र, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने प्रेमीयुगुलांना सुरक्षेची गरज भासत असते. याच प्रेमीयुगलांसाठी राजस्थान पोलिसांनी खास व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रेमीयुगुलांसाठी आश्रम शाळा (शेल्टर होम) उभा करण्याची तयारी सुरू असल्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक श्रीनिवास राव यांनी सांगितले. घरच्यांच्या विरोधात जाऊन विवाह बंधनात अडकेल्या प्रेमीयुगुलांसाठी हेल्पलाईन नंबर लाँच करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात प्रेमीयुगुलांना हेल्पलाईनची सुविधा देण्याचा आदेश पोलिस मुख्यालयाने दिला आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिरिक्त पोलिस महसंचालक श्रीनिवास राव यांनी प्रस्ताव मांडला. घरच्यांच्या विरोधात जाऊन विवाह बंधनात अडकलेल्या प्रेमीयुगुलांना सुरक्षा देण्यासंदर्भात या प्रस्तावात उल्लेख करण्यात आला आहे. यांसंदर्भात राव यांनी प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात प्रेमीयुगुलांच्या मदतीसाठी विशेष महिला पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे.