Pune News : सहकार विभागाची मानीव अभिहस्तांतरणासाठी (डीम्ड कन्व्हेअन्स) 1 ते 15 जानेवारी दरम्यान खास मोहीम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सद्य:स्थितीला तब्बल 60 हजारांहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांनी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) केलेले नाही. परिणामी या इमारती किंवा गृहनिर्माण संस्थांची जागा बांधकाम व्यावसायिकाच्याच नावावरच आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करून मालकी हक्काचा पुरावा मिळावा, या उद्देशाने सहकार विभागाने दि. 1 ते 15 जानेवारी या दरम्यान मानीव अभिहस्तांतरणासाठी खास मोहिमेचे आयोजन केले आहे. मोहिमेच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना सूचना दिल्या आहेत.

याबाबत सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणाले, बांधकाम विकसकाने इमारतीचे बांधकाम करून सोसायटीकडे हस्तांतरण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया केली जात असली, तरी व्यावसायिक मानीव हस्तांतरण करून दिले जात नाही. परिणामी भविष्यात सोसायटी पुनर्विकासात अडचणी येतात. पुनर्विकासात वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळण्यात अडचण येते. हक्काचा पुरावा म्हणून मिळणारी मिळकत पत्रिका किंवा सदनिके ची सहज खरेदी-विक्री व्यवहार होत नाही, तसेच इतरही लाभ मिळत नाहीत. मानीव अभिहस्तांतरण झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतातच, तसेच बांधकाम व्यावसायिकाचा हक्क संपुष्टात येतो.

महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार बांधकाम व्यावसायिकाने मालकी हक्काचे हस्तांतरण करून देणे बंधनकारक आहे. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास मोफा कायद्यांतर्गत केलेल्या सुधारणान्वये एकतर्फी हस्तांतरण करण्याची तरतूद आहे. त्यानुसार ज्या संस्थांची नोंदणी झाली आहे, त्या संस्थेमधील सदनिकाधारकांसाठी खास मोहीम सहकार विभागाकडून राबवण्यात येणार आहे, असेही कवडे यांनी सांगितले.

क्लिष्ट प्रक्रिया केली सोपी
मानीव हस्तांतरण करण्याची क्लिष्ट प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यापूर्वी हस्तांतरणासाठी 20 पेक्षा अधिक कागदपत्रांची आवश्यकता होती. त्यातील अनेक कागदपत्रे कमी केली आहेत. सध्या केवळ आठ ते नऊ प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरण करण्यात येत आहे.