पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस भरती

 पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन (अमोल येलमार) – पिंपरी-चिंचवड स्वतंत्र आयुक्तालयाच्या समस्या हळू हळू सुटताना दिसत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे नुकतेच उदघाटन झाले आणि कामकाजही सुरु झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यांचीही कमतरता फारसी भासवत नाही, मात्र कर्मचारी संख्या कमी आहे. पोलीस आयुक्तालयासाठी येत्या दिड महिन्यात खास पोलीस भरती होणार आहे तसेच राज्यातून इच्छुक कर्मचारीही देण्यात येणार आहेत. यामुळे फेब्रुवारी महिन्या अखेर एक हजार पोलीस कर्मचारी मिळण्याची शक्यता असून यास पोलीस आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेनंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस दलातून विभाजन होऊन १५ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. यासाठी पुणे शहर-ग्रामीण पोलिस दलातून सुमारे साडे सतराशे मनुष्यबळ देण्यात आले असून यातील ३७० ग्रामीण पोलीस दलातील आहेत. मात्र हे मनुष्यबळ सध्या आयुक्तालयासाठी कमी आहे. त्यामुळे स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविण्याबाबतही आराखडा देण्यात आला होता. मात्र, भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक बाबी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे नाहीत. त्यामुळे भरती प्रक्रिया राबविणे अवघड असून, मनुष्यबळ मिळण्यात अडचणी येत होत्या.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची भौगोलिक रचना, घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण आणि पिंपरी-चिंचवडला आवश्यक असलेले मनुष्यबळ यात बरीच तफावत आहे. तसेच पुणे शहर-ग्रामीण पोलिस दलाकडून देण्यात आलेले पोलिस, वाहने आणि अध्यादेश यातील तफावत पोलीस आयुक्त पद्मनाभन आणि अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तालयाचे उद्घाटन केले, तेव्हाही सादरीकरणाद्वारे हीच बाब मुख्यमंत्र्यांसह महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यासमोर पोलीस आयुक्तानी मांडली होती.

नागपूर येथे १३ ते १८ जानेवारी दरम्यान राज्य पोलिस विभागाच्या ३१ व्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ तारखेला झाले. सतरा तारखेला राज्यातील सर्व आयपीएस अधिकाऱ्यांची पडसलगीकर यांनी बैठक घेतली. त्या वेळी राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांसह एकंदरीत कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली. त्यावेळी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील मनुष्यबळाचा विषय झाला. यावेळी राज्यातील इतर जिल्ह्यांतून किमान ३०० ते ५०० पोलिस देण्याविषयी आणि स्वतंत्र पोलीस भरती करण्याविषयी निर्णय झाला आहे. यास पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दुजोरा दिला आहे.