केंद्र सरकारला ‘कोविशिल्ड’ 200 रूपयांना तर प्रायव्हेटमध्ये कितीला ? ‘सिरम’च्या पूनावालांनी दिली ‘ही’ माहिती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : येत्या शनिवारपासून (दि. १६) भारतात लसीकरण मोहिम सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी भारत सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून ( Serum Institute of India) १.१ कोटी डोस विकत घेतले आहेत. देशातील १३ शहरांमध्ये ही लस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, सीरमचे सीईओ अदर पूनावाला( Adar Poonawalla) यांनी सरकारला १० कोटी डोस २०० रुपयांमध्ये देणार असल्याचं सांगितलं आहे.

अदर पूनावाला म्हणाले की, सध्या परवडेल अशा दरात लस पुरवली जाईल. याचा उत्पादन खर्च 200 रुपयांपेक्षा थोडासा जास्त आहे. त्यामुळे सध्यातरी कोणताही फायदा न पाहता देशासाठी आणि सरकारसाठी 10 कोटी डोस पुरवण्यात येणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, सरकारला २०० रुपयांच्या विशेष किंमतीमध्ये १० कोटी डोस देण्यात येणार आहेत. याबाबत सरकारकडून विनंती करण्यात आली होती. सर्वसामान्य, गरीबांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना आधार द्यायचा आहे. यानंतर आम्ही लशीची विक्री १ हजार रुपयांमध्ये प्रायव्हेटमध्ये करणार असल्याचंही सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं.