जरा हटके : पती दाढी करत नाही म्हणून पत्नीचा घटस्फोटाचा अर्ज

भोपाळ : वृत्तसंस्था – आजकाल तरुणांमध्ये दाढी वाढवण्याचा ट्रेंड वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून दाढी ही ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनू लागली आहे. मात्र हीच दाढी जर घटस्फोटासाठी कारण बनली तर… ? भोपाळमध्ये एका महिलेने चक्क नवरा दाढी करीत नाही, अंघोळ करीत नाही, म्हणून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

संसारात अति वादविवाद निर्माण झाल्यावर लोक घटस्फोटाचा निर्णय घेतात. मात्र भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने नवरा दाढी करत नाही, अंघोळ करत नाही अशा कारणांमुळे त्या तरूणीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. या महिलेचा २०१६ साली विवाह झाला आहे. वर्षभरापर्यंत या दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. परंतु, पतीने दाढी वाढवली आणि या दोघांच्या नात्यात कटूता यायला सुरुवात झाली. पती दाढी करीत नाही. थंडीचं कारण पुढं करून तो अंघोळ करीत नाही. परफ्यूम लावून अंगाचा वास झाकण्याचा प्रयत्न करतो, असा आरोप करीत महिलेनं कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

मात्र, बायकोने घटस्फोटाचा अर्ज केला तरी नवऱ्याने माघार घेतली नाही. काहीही झालं तरी मी दाढीला ब्लेड लावणार नाही, मी कसं जगायचं, काय करायचं, हे मी ठरवेन या सगळ्या गोष्टी मला बायकोने सांगायची काय गरज, असं म्हणत त्या नवऱ्याने त्याच्या  बायकोला न्यायालयासमोर सुनावलं आहे. मी बदलणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नवऱ्याला बायकोपेक्षा दाढीच प्यारी असल्याचं दिसतंय.

दरम्यान, घटस्फोट होऊ नये यासाठी अधिकारी त्यांचे काउसलिंग करीत आहेत.