खुशखबर ! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यानंची सोय व्हावी यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी 26 जुलै रोजी पत्रव्यवहार करुन ट्विट करत गणेशोत्वासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सुरु करण्याची मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी 26 रोजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले होते आणि ट्विट केले होते. त्यांनी पत्रातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरु करुन दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. तसेच त्यांनी पत्रात म्हटले होते की, कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई पुणे जिल्ह्यातून लोक आपल्या मुळगावी जातात. दरवर्षी रेल्वे व राज्य परिवहन सेवा सुरु असल्याने कोणती अडचण येत नव्हती. मात्र, यांदा कोविडचे संकट देशासह राज्यावर आहे.

वास्तवीक महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक सह इतर रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. त्याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरु करावी अशी माझ्यासह इतर अनेक संघटनांनी विनंती केली होती. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून अद्याप गाड्या सुरु करण्यात आल्या नाहीत. मात्र इतर राज्यातील लोक गाड्यामंधून त्यांच्या गावी गेले आणि पुन्हा महाराष्ट्रातही आले. परंतु महाराष्ट्रातील जनतेला या गाड्यांचा काहीच फायदा झालेला नाही. किमान गणेशोत्सवासाठी तरी कोकणातील चाकरमान्यांना रेल्वे सेवा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रातून केली होती. आता ही मागणी मान्य झाली असून कोकणातील चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्य सोडल्या जाणार आहेत.