बहीण-भावाचे प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी खास ‘पाकीट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाऊ बहिणीच्या प्रेमांच प्रतीक असलेला सण रक्षाबंधन काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवशी दूर राहणाऱ्या भावाला राखी पाठवणाऱ्या बहिणीसाठी टपाल खात्याने एक नवीन योजना तयार केली आहे. टपाल खात्याकडून एक विशेष पाकिट तयार करण्यात आले आहे. टपाल खात्याचं हे पाकिट अतिशय माफक दरात मिळणार असून याची किंमत दहा रुपये ठेवण्यात आली आहे. या योजनेमधून भावा बहिणीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, हा टपाल खात्याचा एक प्रयत्न आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या कालावधीत टपाल खात्याचे कर्मचारी, अधिकारी कामावर हजर आहेत. सार्वजनिक पद्धतीने सण साजरे करण्यावर बंधने आली असली तरी घरात सण साजरा करण्यावर काही बंधने नाहीत. रक्षाबंधनाच्या माध्यमातून सध्याच्या नकारात्मक वातावरणात काहीशी सकारात्मक भावना होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

रक्षाबंधनासाठी टपाल खात्याने तयार केलेल्या कलात्मकतेने हे विशेष पाकिट तयार करण्यात आले आहे. कमीत कमी वेळात या पाकिटाच्या माध्यमातून राखी बहिणीकडून भावाकडे पोचावी व त्याद्वारे बहिणीचे प्रेमही भावाला मिळावे, असा टपाल खात्याचा प्रयत्न आहे. तरुणाई व लहान मुलामुलींना आवडेल अशा प्रकारे हे पाकीट तयार करण्यात आले आहे. हे पाकीट पावसाळी वातावरणात टिकेल, अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

टपाल खात्याच्या मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी याबाबत सांगितले, रक्षाबंधनाच्या निमित्ताने टपाल खात्याने कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीत या प्रकारे भाऊबहिणीमधील पवित्र प्रेमाचा सण अधिक चांगल्या प्रकारे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हे पाकीट आजपासून तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात मिळेल.