दहावीत गणितात मिळाले 2 मार्क, रिचेकिंगला दिल्यावर मिळाले 100 पैकी 100

पोलिसनामा ऑनलाईन – हरियाणा बोर्डाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालानंतर एक विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे. सुप्रिया नावाच्या एका दिव्यांग विद्यार्थीनीला दहावीच्या निकालात गणित विषयात केवळ दोन गुण मिळाले. मात्र तिने पेपर रिचेकिंगला टाकल्यानंतर तिचे गुण थेट 98 ने वाढले आणि तिला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

हरियाणा बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनने घेतलेल्या 10 वीच्या परिक्षेमध्ये सुप्रियाला गणित विषयात केवळ दोन गुण मिळाले होते. निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. सुप्रिया ही अंध असल्याने तिने दिव्यांग विद्यार्थीनी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीप्रमाणे तिचे पेपर तपासले गेले नाहीत. त्यामुळेच तिने रिचेकिंगसाठी अर्ज केला. रिचेकिंगमध्ये गणित विषयाचे तिचे गुण थेट 2 वरुन 100 झाले.मला गणितामध्ये दोन गुण असल्याचे निकालामध्ये दाखवण्यात आले होते. ते पाहून मला धक्काच बसला, मी दु:खी झाले होते. माझ्या वडिलांनी पेपर रिचेकिंगला टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मला 100 गुण असल्याचा निकाल आला. कोणत्याही दिव्यांग विद्यार्थ्याबरोबर असे होऊ नये यासंदर्भात बोर्डाने काळजी घेतली पाहिजे असे सुप्रियाने सांगितले. सुप्रिया ही अंशत: अंध असून तिला सर्व विषयांमध्ये 90 च्या वर गुण होते. केवळ गणितामध्ये दोन गुण होते. त्यामुळेच आम्ही पेपर रिचेकिंगला टाकण्याचा निर्णय घेतल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. मी स्वत: गणित विषयाचा शिक्षक आहे. माझ्या मुलीला सर्व विषयामध्ये चांगले गुण मिळाले मात्र गणितामध्ये केवळ दोन गुण मिळाल्याने आम्हाला आश्चर्य वाटल्यामुळे पेपर रिचेकिंगला देण्याचा निर्णय घेतला. रिचेकिंगमध्ये तिला 100 गुण मिळाल्याचे चाज्जूराम यांनी सांगितले आहे.