आजोबांना,पुतण्याला मतं दिली आता नातवाला पण… आम्ही तुमचे गुलाम नाही

घराणेशाहीविरोधातील बॅनरबाजीने चर्चेला उधाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याची खासियत ‘पुणेरी पाट्या’ जगभरात फेमस आहेतच. पण आता पुणेकरांना बॅनरबाजीची देखील सवय झाली आहे. मग प्रेम वीरांपासून ,साड्यांचे सेल, ते अगदी राजकारण्यांना टोलेबाजी या बॅनर्स च्या माध्यमातून केली जात आहे. आता पिंपरी चिंचवड परिसरात ऐन निवडणुकीच्या काळात केलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय बनत आहे. ‘कुटुंब कल्याणाला घरी पाठवा’, ‘आम्ही तुमचे गुलाम नाही’ अशा आशयाचे बॅनर्स या परिसरात झळकत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यंदा लोकसभेसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोस्टरद्वारे सरळ सरळ राष्ट्रवादीच्या मावळातल्या उमेदवाराला घरी पाठवण्याचे म्हणजेच निवडून न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नक्की काय आहे ही बॅनरबाजी

“स्व. कृष्णां मोरे यांना श्रद्धांजली फक्त यांच्या पराभवानेच मिळेल, कुटुंब कल्याणाला घरी पाठवा ” असे मोठे बॅनर लावण्यात आले आहे. तर या बॅनरच्या शेजारीच ‘गुलामी हटाव’ या मथळ्याखाली एक छोटे पोस्टर लावण्यात आले आहे. “मतदारांनी आजोबांना मतं दिली, पुतण्याला दिली, आता नातवाला पण… माफ करा आम्ही तुमचे गुलाम नाही …” अशा आशयाचे पोस्टर्स या परिसरात लावण्यात आले आहेत. या दोन्हींच्या खाली एक सजग नागरिक असे लिहण्यात आले आहे.

या पोस्टरवरून मात्र सरळसरळ पवार घराण्यावर टीका करण्यात आल्याचे दिसत आहे. या पोस्टर्सचा इशारा मावळचे उमेदवार पार्थ पवार यांच्यावर आहे. हे पोस्टर चिंचवड येथील प्रो. रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह परिसरात लावण्यात आले आहे. यापूर्वी बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील खासदार होते. त्यानंतर आता अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या बॅनरबाजीवरून पुन्हा एकदा पवार कुटुंबाला घराणेशाही वरून लक्ष्य करण्यात आले आहे.

दिवंगत प्रो रामकृष्ण मोरे आणि शरद पवार यांचे कधीच पटले नाही. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पिंपरी चिंचवड वरून मोरे यांचे वर्चस्व कमी करण्यात राष्ट्रवादीचा मोठा हात होता. याचा रोष आजही इथल्या मोरे समर्थकांमध्ये आहे असे या पोस्टरवरून दिसते.