..तर आपण आजही विधवांना जाळत राहिलो असतो : नयनतारा सहगल

मुंबई : वृत्तसंस्था – यवतमाळ मध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनावरून वाद चालू आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर मनसेसह काही संघटनांनी विरोध केल्यानंतर सेहगल यांना देण्यात आलेलं निमंत्रण मागे घेण्यात आलं आहे. असं असलं तरी उद्घाटक म्हणून नयनतारा सेहगल यांनी तयार केलेलं भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या भाषणात देशातील सद्य परिस्थितीवर अत्यंत परखड भाष्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारवर आणि हिंदुत्ववाद्यांवर सहगल यांनी सडकून टीका केली आहे. साहित्यिकांनी आपली लेखणी अधिक धारधार करून सरकारच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवायला हवा, असं आवाहनही यात करण्यात आलं आहे.
काय म्हणाल्या  नयनतारा सहगल –
भावना दुखावणे वगैरे अर्थातच निव्वळ निरर्थक आहे. शंभर कोटी लोकांना एकाच पद्धतीने विचार करायला लावणे केवळ अशक्य आहे. प्रत्येक समाजगटाला विविध प्रश्नांवर त्याची स्वतंत्र मते असतात आणि त्याच्या स्वतंत्र संवेदना असतात. पण काय चूक आणि काय बरोबर हे भावनांवर ठरत नाही. काही बाबतीत तर भावनांना धक्का लावणे हे आपले कर्तव्यच असते.

भावना दुखावण्यावर जर बंदी असती, तर आपण आजही विधवा स्त्रियांना जाळत राहिलो असतो आणि कुठल्याही प्रकारची सुधारणा कधीच झाली नसती. संसदेमध्ये हिंदू कोड बिलावर चर्चा सुरू असताना अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या आणि साधूंनी संसद भवनावर दगडफेक केली होती. पण जर ते विधेयक पास झाले नसते, तर हिंदू स्त्रियांना कुठलेही हक्क मिळाले नसते.
सध्या भारतामध्ये जे काही चालले आहे त्याबद्दलच तुमच्याशी बोलायला हवे हे माझ्या लक्षात आले. याचे कारण म्हणजे, या गोष्टी आपल्या जीवनाच्या प्रत्येक बाबीवर वाईटरित्या परिणाम करत आहेत; आपण काय खातो, कुणाशी विवाह करतो, काय विचार करतो, काय लिहितो आणि अर्थातच, आपण ईश्वराची प्रार्थना कशी करतो. आज अशी परिस्थिती आहे, जिच्यात वेगळेपण आणि सत्तारुढ विचारप्रणालीला विरोध या गोष्टींवर भयंकर हल्ले होत आहेत.
स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जडणघडण करणाऱ्या आपल्या पूर्वसूरींनी देशाकरता धार्मिक ओळख नाकारली होती आणि भारताला एक निधर्मी लोकशाही प्रजासत्ताक देश घोषित करण्याचा सूज्ञपणा दाखवला होता. याचा अर्थ ते धर्मविरोधी होते असे नव्हे.
वैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आपल्याकडे विविध भाषांमधले प्राचीन साहित्य आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो, आपली वेशभूषा वेगवेगळी आहे, आपले सण वेगवेगळे आहेत आणि आपण वेगवेगळ्या धर्मांचे आचरण करतो. आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे. हे धोरण एका फटक्यात, हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यवधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे घटनात्मक अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक, बाहेरचे आणि शत्रू ठरवू पाहते आहे.
मला विशेषतः मराठी स्त्री लेखिकांना सलाम करायला हवा, कारण स्त्रियांना आपले जीवनानुभव शब्दांमध्ये कागदावर उतरवण्याकरता कितीतरी भयंकर अडथळे पार करावे लागतात. आपला पती, आपले कुटुंब आणि समाजाला दुखावण्याचा धोका त्यांना पत्करावा लागत असतो. त्यांची सृजन उर्जा उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो.
आपला देश एका दुविधेत सापडला आहे. आपण कुठला मार्ग निवडावा – स्वातंत्र्याकडे की स्वातंत्र्यापासून दूर – ही गोष्ट इतर अनेक गोष्टींबरोबरच आपण काय लिहितो यावर आणि आपल्याला गप्प राहण्यास भाग पाडणाऱ्यांपुढे मान तुकवण्याचे नाकारण्यावर अवलंबून असेल. ज्यांच्या हत्या झाल्या आहेत त्यांचे स्मरण करून, वेगळे मत मांडण्याच्या हक्काकरता उभे राहणाऱ्यांना पाठिंबा देऊन आणि भय व अनिश्चिततेच्या छायेत जगणाऱ्या, पण तरीही आपले मत व्यक्त करणाऱ्या, विरोधी मत असलेल्या सर्वांकरता, आपण स्वातंत्र्याचा मार्ग निवडू या.