मालमत्ता विकण्यापेक्षा महापालिकेच्या ठेवींतून खर्च करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, असे पुणे महापालिका म्हणत आहे. यासाठी महापालिकेच्या मालकीच्या काही मालमत्ता विकण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र, मालमत्ता विकण्यापेक्षा महापालिकेकडे असलेल्या सुमारे १७०० कोटी रुपयांच्या ठेवीतून खर्च करावा, अशी मागणी राष्टवादी कॉँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांनी केली आहे.

पुणे महापालिका आजपर्यंत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात होती. या वेळी उत्तम आर्थिक व्यवस्थापनामुळे महापालिकेचे उत्पन्न चांगले वाढले. यातूनच आजच्या घडीला सुमारे १७०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवी मोडणेही खरे तर योग्य नाही. परंतु, कोरोनाचे संकट भयंकर आहे. या काळात हा भावनिक मुद्दा न करता खर्च करण्याची गरज आहे.

भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील पदाधिकारी त्यांच्या दिल्लीतील नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून मालमत्ता विकण्याच्या योजना आखत आहेत. महापालिकेने सामान्य लोकांसाठी बांधलेली घरेही विकण्याचे ठरवित आहेत. त्याचबरोबर सोसायट्यांच्या अ‍ॅमेनिटी स्पेसवरही त्यांचा डोळा आहे. कोरोना संकटाचे निमित्त करून आपल्या निकटवर्तीय बिल्डरांच्या घशात या मालमत्ता घालण्याचा डाव असल्याचे दिसत आहे. यापेक्षा प्रशासनाला अगदीच गरज पडली तर त्यांनी ठेवी मोडून किंवा त्याच्या आधारे कर्ज घेऊन निधीची उभारणी करता येऊ शकते. त्याचबरोबर इतर विकासकामांसाठी भांडवल बाजारातून रोखे काढण्यासारख्य प्रस्तावावरही विचार होऊ शकतो.

पुणेकर नागरिकांनी यंदाच्या वर्षी तब्बल ८०० कोटी रुपयांचा कर भरून महापालिकेला आधार दिला आहे. प्रशासन अभय योजना आणण्याच्या विचारात असून त्यातूनही मोठी रक्कम उभी राहू शकते. उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधणे गरजेचे आहे. यापेक्षा वांड मुलगा जशी वाडवडीलांनी कमावलेली इस्टेट विकतो, त्याप्रमाणे पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी वागत आहेत. त्यांना राज्य शासनानेच रोखण्याची गरज आहे.